लोकसंख्या प्रमाणित करण्याचे ‘जलसंपदा’चे निर्देश

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) लोकसंख्येबाबतचा अहवाल पाठवून जलसंपदा विभागाकडे पाण्याची मागणी केली आहे. मात्र, पीएमआरडीए क्षेत्रासाठी तूर्त ९० लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिवस पाणी देण्यात येणार असून तूर्त पाणीकोटा निश्चित करता येणार नसल्याचे कळवण्यात आले आहे. तसेच पीएमआरडीएने लोकसंख्या प्रमाणित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (महाराष्ट्र वॉटर र्सिोसेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) महानगर, शहर, शहराच्या बाहेरील हद्द, ग्रामपंचायत, खेडे आदींच्या लोकसंख्येच्या आधारावर मापदंड निश्चित केले आहेत. त्यानुसार पीएमआरडीए क्षेत्रासाठी ९० लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिवस पाणी निश्चित केले आहे. पीएमआरडीएने लोकसंख्येबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाला दिला आहे. मात्र, लोकसंख्या शासनाच्या जीवन प्राधिकरण सांख्यिकी विभागाकडून प्रमाणित करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अहवाल आल्यानंतर पाणीकोटय़ाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पीएमआरडीएने मागणी केलेल्या पाण्याबाबत जलसंपदा विभाग, पीएमआरडीए आणि जलसंपत्ती प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये जलसंपदा विभागाने लोकसंख्या प्रमाणीकरण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. पीएमआरडीएकडून जलसंपदा विभागाकडे पाण्याबाबत मागणी करताना ४१ लाख लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे. मात्र, २०३१ पर्यंतची लोकसंख्या किती असेल याबाबतचे प्रमाणीकरण निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार लोकसंख्या प्रमाणीकरण करण्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आले आहे.

अहवाल पाठवण्याची सूचना

पीएमआरडीएने अंदाजे लोकसंख्या दाखवून पाण्याची मागणी केली आहे. मात्र, जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्देशानुसार विभाग आणि क्षेत्रनिहाय पाण्याचे मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएला तूर्त प्रतिव्यक्ती प्रतिदिवस ९० लिटर पाणी देण्याचे निश्चित केले आहे. पीएमआरडीएने शासनाच्या जीवन प्राधिकरण सांख्यिकी विभागाकडून लोकसंख्या प्रमाणीकरण करून अहवाल पाठवावा, असे कळवण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी दिली.

पीएमआरडीएचे क्षेत्र  सात हजार ३५६ चौरस किलोमीटर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तीन कटक मंडळांचे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) क्षेत्र वगळता उर्वरित सात तालुके आणि ८५७ गावांचा समावेश अशी सात हजार ३५६ चौरस किलोमीटर एवढे पीएमआरडीएचे क्षेत्र आहे. त्यापैकी दौंड आणि पुरंदर तालुक्यांमध्ये सिंचनासाठी खडकवासला धरणसाखळीतून पाणी देण्यात येते. परिणामी, हे दोन तालुके आणि इतर क्षेत्र वगळून पीएमआरडीएला लोकसंख्या प्रमाणीत करावी लागणार आहे.