News Flash

जे मनात रहात नव्हते ते कवितेत मांडत गेलो..

माझ्यासारखेच दु:ख जे अनेक जण अनुभवत आहेत त्यांचे दु:ख मांडण्याचे मी एक माध्यम आहे, असे मनोगत कवी प्रा. वीरा राठोड यांनी शनिवारी व्यक्त केले.

| July 19, 2015 03:45 am

माझ्या मनाला ज्या गोष्टी अस्वस्थ करत गेल्या त्या मी कागदावर मांडत गेलो. मी जे सोसले, अनुभवले ते मी लिहिले. माझी अस्वस्थता कुणाला तरी सांगाविशी वाटली तेव्हा मला कवितेची साथ मिळाली. जे माझ्या मनात रहातच नव्हते ते मी मांडत गेलो. माझ्यासारखेच दु:ख जे अनेक जण अनुभवत आहेत त्यांचे दु:ख मांडण्याचे मी एक माध्यम आहे, असे मनोगत कवी प्रा. वीरा राठोड यांनी शनिवारी व्यक्त केले.
प्रा. राठोड यांच्या ‘सेनं सायी वेस’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल अ. भा. मराठी युवा साहित्य संमेलन आणि टेकरेल अकादमी यांच्या वतीने राठोड यांचा सत्कार शनिवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ नेते उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नियोजित विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लेखक सचिन परब यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कोणतीही शैक्षणिक पाश्र्वभूमी नसलेल्या लमाण तांडय़ावर बालपण काढलेल्या आणि नंतर शिक्षणाच्या जोरावर कवी, साहित्यिक बनलेल्या प्रा. वीरा राठोड यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या कवितेचा प्रवास विस्ताराने मांडला. मनाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी मी कवितेतून मांडत गेलो. पुरस्कारासाठी मी कधीच काही लिहिले नाही, असे सांगून ते म्हणाले की, साहित्य कशाला म्हणतात हे मला माहितीच नव्हते. माझा माझ्या मनाशीच जो संवाद आहे तो कवितेच्या रूपाने बाहेर आला आहे. चांगले मित्र, चांगले गुरू, चळवळी आणि पुस्तके यांनी मला घडवले आहे.
स्पर्धा परीक्षा देणारे युवक कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांना आवाहन करताना प्रा. शेषराव मोरे म्हणाले की, बुद्धिमान तरुण आज डॉक्टर, अभियंते किंवा सनदी अधिकारी होत आहेत. पण सामाजिक शास्त्रे, इतिहास, कला, कायदा या विषयांच्या अभ्यासाकडे बुद्धिमान तरुण वळत नाहीत. सामाजिक शास्त्राकडे आपले दुर्लक्ष होत आहे. माझे समाजासाठीही काही तरी देणे आहे ही भावना मनात ठेवून तुमच्या पेशात असतानाही काही वेळ  सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करा. देशाच्या समस्यांचा अभ्यास बुद्धिमान तरुणांनी करायलाच हवा.
देशातील वाढती जातीयता, धार्मिक उन्माद हे आजचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जाणती मंडळी याचे समर्थन करत आहेत. अशा काळात समाजाला दिशा देणाऱ्या, निर्मितीशील व्यक्तींवर जबाबदारी येते, असे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले. लिहिल्याशिवाय राहवत नाही अशा वाटेवर चालणारे जे कवी, साहित्यिक असतात त्या वाटेवरचा वीरा राठोड हा कवी आहे. सामाजिक चिंतन करणारा, सामाजिक भान असलेला तरुण वर्ग निर्माण होणे ही आजची गरज आहे, अशी अपेक्षा उल्हास पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 3:45 am

Web Title: poet pro weera rathod honour
टॅग : Honour
Next Stories
1 शाळा आणि शासनाच्या आडमुठेपणाचा पालकांना फटका
2 मध्य रेल्वेकडून गणपतीसाठी आणखी ११४ गाडय़ा
3 ‘क्षमतांचे वास्तवामध्ये रूपांतर करण्याच्या धोरणातूनच भारत महासत्ता होऊ शकेल’