News Flash

‘गज़ल हा काळजातून उमटलेला उद्गार!’

शेरांची सुगंधित माळ गुंफत गज़ल लेखन करणे ही एक प्रकारची जोखीमच असते,

गज़लमधील शेर बंदा रुपयासारखा खणखणीत हवा. प्रत्येक शेर म्हणजे जीवनानुभवाचे छोटे-मोठे तुकडे आहेत.

ज्येष्ठ कवी-गज़लकार रमण रणदिवे यांचे मनोगत

पुणे : जगण्याच्या प्रश्नांकित वास्तवाला कवीने भिडले पाहिजे. कविता असो किंवा गज़ल, ती जगण्याची असोशी मांडत असते. गज़ल म्हणजे काळजातून उमटलेला उद्गारच असतो. असा काळजातून उमटलेला उद्गार कवीला समृद्ध करतो.. अशा शब्दांत ज्येष्ठ कवी-गज़लकार रमण रणदिवे यांनी गज़लचे सूत्र मांडले.

‘हसवून चेहऱ्याला फसवून लोक गेले, आयुष्य टाचलेले उसवून लोक गेले’ ही माझी गज़ल ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाली. तेव्हापासून मी मागे वळून पाहिलेच नाही, अशा शब्दांत रणदिवे यांनी ५५ वर्षांचा कविता आणि गज़ल लेखनाचा प्रवास उलगडला. ‘लोकप्रभा’तील गज़ल वाचून सुरेश भट यांचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. त्यांनी माझी भरकटलेली गज़ल जागेवर आणली. भट यांच्यासह डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी, शांता शेळके आणि शंकर वैद्य अशा बुजुर्गाचे मार्गदर्शन लाभले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

‘गज़ल सहजासहजी वश होत नाही. त्यासाठी आयुष्याला भिडलं पाहिजे. गज़लमधील शेर बंदा रुपयासारखा खणखणीत हवा. प्रत्येक शेर म्हणजे जीवनानुभवाचे छोटे-मोठे तुकडे आहेत,’ अशा शब्दांत भट यांनी मला मार्गदर्शन केले. आपल्याला कवितालेखनाचे दान मिळाले आहे तर मग आपल्या अभिव्यक्तीतून समाजालाही दान देता आलं पाहिजे, असे ते आवर्जून सांगत. अनुभवाच्या शाळेत शिकलेला कवी सतत वाढत असतो याची प्रचिती मला वेळोवेळी येत गेली, असे रणदिवे यांनी सांगितले.

गज़ल म्हणजे प्रेयस अनुभूतीच्या विविध छटांची प्रचिती. प्रेम ही विश्वव्यापक आणि बहुरंगी कल्पना गज़लमधून व्यक्त करता येते. मीलन, विरहाची आर्तता, स्वप्नीलता अशा विविध भावभावनांचा कल्लोळ गज़लमधून मांडता येतो. शेरांची सुगंधित माळ गुंफत गज़ल लेखन करणे ही एक प्रकारची जोखीमच असते, असे त्यांनी सांगितले. बहुप्रसवता कधी कधी गुणवत्तेला मारक ठरते, असे मला वाटते. ५५ वर्षे काव्यरचना करत असूनही माझे केवळ पाचच संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आतून येतं तेव्हाच मी लिहितो. आतून येणं हे मनाचं नितळ पाझरणं असतं. हे कळतं तेव्हा शब्द खुणा करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 1:42 am

Web Title: poet raman randive talk about ghazal zws 70
Next Stories
1 उर्वरित शिक्षक भरती आता निवडणुकीनंतरच
2 पिंपरीचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली
3 शरद पवार आमचे अमिताभ बच्चन: जितेंद्र आव्हाड
Just Now!
X