पाच दिवस चाललेल्या अभिव्यक्ती-उत्सवाची सांगता

पाचही खंडांतील विविध देशांतून आलेल्या पन्नासहून अधिक कवींच्या बहुभाषी काव्यवाचनाचा सोहळा शनिवारी पुण्यात सुमारे चार तास चालला आणि श्रोत्यांनीही लक्षपूर्वक अनुभवला, याचे कारण या साऱ्याच, म्हणजे सुमारे सव्वाशे-कवितांमध्ये माणूसपणाचा जागर होता! आजच्या माणसांची दु:खे, चिंता, भीती, राजकीय अथवा सामाजिक कुंठितावस्था, या साऱ्यांचा विचार करणाऱ्या या कविता होत्या.

‘पेन’ आंतरराष्ट्रीय साहित्यिक संघटनेच्या ८४ व्या आणि भारतात प्रथमच झालेल्या परिषदेचा शनिवारचा अखेरचा दिवस कविसंमेलसाठी राखीव होता. वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात मराठी आणि इंग्रजी कविता अधिक होत्या, पण कोंकणीपासून कोरियनपर्यंत अनेक भारतीय व परदेशी भाषांतील कविता सादर झाल्या. सोबत त्या कवितांचे मराठी किंवा इंग्रजीतील अनुवादही श्रोत्यांपर्यंत पोहोचत होते. रोमानियाच्या कवयित्री मॅग्दा कार्नेची यांनी ‘जिप्सीची भाषा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोमा भाषेतील कविता सादर केल्या. डोक्यावर छप्पर नसतानाही आभाळभर स्वप्ने पाहणाऱ्या आणि कुणाशी शत्रुत्व घेण्याऐवजी निसर्गाशी नाते जोडणाऱ्या या रोमा कवितांना दाद मिळालीच, पण अनेक चिनी, कोरियन कवींनी आपापल्या भाषेत सादर केलेल्या भावकवितांचा सामाजिक आशय लक्षात येत असल्याने त्यांनाही पसंतीची पावती मिळाली. यापैकी एका कवीने आईच्या आठवणीचे भावगीतच सादर केले, पण राजकीय दमनशाहीमुळे मायदेश सोडावा लागल्याची वेदना त्या गीतात होती. चिनी नोबेल- मानकरी लिऊ शिआबाओ (चिनी तुरुंगात निधन – २०१७) व त्यांची पत्नी यांनी एकमेकांना कवितेतून जी पत्रे लिहिली, त्याचे वाचन येथे करण्यात आले.

एका कोरियन कवीने देश तुटलेला असल्याची व्यथा मांडली, तर ऑस्ट्रेलियन कवयित्री डायना कोझेन्स यांनी त्यांच्या देशाने हाकलून लावलेल्या घुसखोरांची बाजू समजून घेणाऱ्या दोन कविता सादर केल्या.

बंगाली कवींनी शालीन-सुसंस्कृत शब्दांत सशक्त आशयाच्या कविता सादर केल्या, तर कन्नड कवयित्री विनया ओकुन्द यांनी ‘एके दिवशी साऱ्या स्त्रिया एकमेकींसह चालू लागतील..’ अशी प्रेरक ललकारी कवितेतून दिली. त्यांचे पती, कवी प्रा. एम. डी. ओकुन्द यांनी हिंसाचाराच्या गौरवीकरणाकडे कवितेतून पाहताना पुरुषीपणा, शस्त्रपूजा या संकल्पनांना आत्म्याची हाक ऐकण्याचे आव्हान दिले. कोंकणी कवी दिलीप बोरकर यांनी वृत्तपत्रांतला हिंसाचार नुसता वाचणाऱ्या, दाहक वास्तवापासून तुटलेल्या माणसाचे शब्दचित्र रेखाटले.

मराठीला दाद..

बहुसंख्य श्रोते मराठीभाषक असल्याने मराठी कवितांना मिळालेली दाद मन:पूर्वक होती. अजय कांडर यांच्या कवितेतील ‘रिंगणातली आणि रिंगणाबाहेरची माणसे’ आजच्या वैचारिक दुफळीवरचे चिंतन निर्णायक स्तरावर नेणारी होती, तर प्रज्ञा दया पवार यांच्या एका कवितेच्या अखेरीस, समाजमाध्यमांतून सभ्य म्हणवणाऱ्यांनी केलेल्या शिवीगाळीला संयमित उत्तर दिले गेले. गणेश विसपुते, संजीव खांडेकर यांच्या कवितांनंतर प्रभा गणोरकर यांनी अनुपस्थित आंतरराष्ट्रीय कवींच्या कविता वाचून दाखविल्या, तर डहाके यांनी कवितेतूनच अध्यक्षीय समारोप केला.