07 July 2020

News Flash

गुंडाच्या  मिरवणुकीत पोलीस सहभागी

आरोपी समीर मुलाणी आणि जमीर मुलाणी यांची एका खूनप्रकरणात न्यायालयाने तात्पुरत्या जामिनावर सुटका केली.

पोलीस निलंबित; आठ जण अटकेत

पुणे : खुनाच्या गुन्ह्य़ात येरवडा कारागृहातून तात्पुरता जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत पिंपरी शहर पोलीस दलातील  पोलीस कर्मचारी सहभागी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करून त्या पोलीस कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून महागडय़ा चार मोटारी, देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय ३६,रा.इंद्रायणीनगर पोलीस वसाहत, भोसरी), आझाद शेखलाल मुलाणी (वय ३०,रा.तळवडे, चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय २१,रा. सुयोगनगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय ३८,रा.मोरे वस्ती, चिखली), संदीप किसन गरूड (वय ४०,रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३), सिराज राजू मुलाणी (वय २२), विनोद नारायण माने (वय २६, तिघे रा. कोळवण, ता. मुळशी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी समीर मुलाणी आणि जमीर मुलाणी यांची एका खूनप्रकरणात न्यायालयाने तात्पुरत्या जामिनावर सुटका केली. येरवडा कारागृहातून शुक्रवारी (२९ मे) सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. त्या वेळी येरवडा कारागृहाबाहेर पिंपरी-चिंचवड, मुळशी, भोसरी, चिखलीतील आरोपींचे मित्र तसेच नातेवाईक जमले होते. मुलाणी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते मोटारीतून पिंपरीकडे निघाले. त्या वेळी त्यांच्याबरोबर वीस ते पंचवीस दुचाकीस्वार होते. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोरू न सर्व जण आरडाओरडा करत पुढे निघाले. त्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

कारागृहाबाहेर जल्लोषाच्या घटना वाढल्या

करोनाचा  संसर्ग  वाढीस लागल्यानंतर कारागृहात असलेल्या कैद्यांना तात्पुरते जामीन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहे. मध्यंतरी लोणी काळभोरमधील वाळू माफिया अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आरोपींच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर जल्लोष केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:16 am

Web Title: police arrest eight suspended akp 94
Next Stories
1 उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या
2 ‘डेक्कन क्वीन’ला ९० वर्षे पूर्ण!
3 मोसमी पावसाचे आनंदघन केरळात!
Just Now!
X