एखाद्या देमार चित्रपटात शोभेल असे थरारनाटय़ सोमवारी पहाटे हिंजवडीत झाले. १५ जणांच्या टोळक्याने एका कंपनीत घुसून तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली, त्यांचे हातपाय दोरीने बांधले आणि तब्बल ५१ लाखाचा माल ट्रकमध्ये भरून पोबारा केला. गस्त घालणाऱ्या पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी ट्रकचा पाठलाग करुन तो घेरला. पण आरोपी अंधारात दडून बसले. पोलिसांनी परिसराला वेढा दिला आणि दिवस उजाडल्यानंतर आरोपींना गजाआड केले.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील, हिंजवडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पाटील या वेळी उपस्थित होते.                                                                                                 साहील सलीम खान (रा. उत्तर शीव, मुंब्रा, ठाणे), सफातुल्ला खान (रा. साकीनाका, मुंबई), राजू यादव (रा. उत्तर शीव, मुंबई) अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे असून ते २१ ते २५ या वयोगटातील आहेत. अन्य आरोपी फरारी झाले आहेत. कंपनीचे व्यवस्थापक मनीष विष्णूप्रताप शर्मा (वय-४२, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस कर्मचारी वर्षां कदम, आरसीपी स्टाफसह प्रदीप पवार, प्रदीप खाटमोडे, सागर इंदलकर, संभाजी बेंद्रे, कल्याण चौधरी, लोंढे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या कामगिरीबद्दल या पथकास पोलीस उपायुक्तांनी १५ हजाराचे बक्षीस जाहीर केले.
उमाप म्हणाले, जपानी कंपनीशी टायअप असलेल्या मदरसन सुमी सिस्टीम कंपनीत पहाटे चारच्या सुमारास १५ जणांचे टोळके घुसले. त्यांनी कंपनीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. सर्वाना दोरीने बांधून ठेवले. त्यांच्याकडील चाव्या घेऊन कंपनीचा ५१ लाखाचा माल ट्रकमध्ये भरून तो पळवून नेला. कंपनीचे गेट उघडे असल्याने गस्त घालणाऱ्या पथकास संशय आला. ते आत गेल्यानंतर त्यांना झाला प्रकार समजला. महिला पोलीस वर्षां कदम यांनी ही घटना नियंत्रण कक्षास कळवली. वाढीव कुमक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा महामार्गालगत शिंदे वस्तीत ट्रक जाताना दिसला. पोलिसांनी तो अडवला असता आरोपी पळाले व अंधारात लपले. पोलिसांनी ट्रकला वेढा घातला, उजाडल्यानंतर तिघे जाळ्यात आले व अन्य आरोपी फरारी झाले.
आरोपी कंपनीशी संबंधित?
वर्षांतून दोन दिवस लेखापरीक्षणाच्या कामासाठी कंपनी बंद ठेवण्यात येते. त्यानुसार, सोमवारी कंपनी बंद होती, त्याचा फायदा चोरटय़ांनी घेतला. याबाबतची माहिती असणारी कंपनीतील माहितगार व्यक्ती या गुन्ह्य़ात सहभागी असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.