22 July 2019

News Flash

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने केल्या ५० घरफोड्या, गुन्हे शाखेने केले जेरबंद

५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत

झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलं आहे. सुनील तलवारे असं सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आत्तापर्यंत ५० घरफोड्या केल्याचं निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुनील तलवारे (२८) हा वडगाव मावळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने जाऊन कारवाई केली असता तो राहत्या घरात पत्नी आणि मुलीसह आढळून आला. आरोपी सुनीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ येथे घरफोड्या केल्याचं समोर आलं.

आरोपी सुनीलला जुळा भाऊ असून तो देखील घरफोड्या करतो अशी माहिती पोलिसांनी दिली. सुनील हा सराईत गुन्हेगार असून त्याला कमी वेळेत जास्त पैसे कमवून श्रीमंत व्हायचं होतं. यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून घरफोड्या करत आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल ५० घरफोड्या केल्या आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने केली आहे.

First Published on March 14, 2019 1:17 pm

Web Title: police arrested a dacoit involve in 50 crimes