पिंपरी-चिंचवड शहरात सोन्याची भिशीच्या (पैश्यांच्या बदल्यात सोने) नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. संजय मारुती कारले (वय- ४२ रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आत्तापर्यंत ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. देहूरोड आणि तळेगाव येथील नागरिकांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार देहूरोड आणि तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड आणि तळेगाव येथील काही नागरिकांना सोन्याची भिसी म्हणजे पैश्यांच्या बदल्यात काही महिने, वर्षांमध्ये सोन्याचे बिस्कीट किंवा दागिने देण्यात येतील असे म्हणून मध्यमवर्गीय व्यक्तींची आरोपी संजय मारुती कारले याने फसवणूक केली आहे. त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात तीन तर तळेगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

आत्तापर्यंत त्याने संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी यांची ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, सोन्याची भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय मारुती कारले हा त्याचे राहते घरी तळेगाव दाभाडे येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती युनिट पाचच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयूर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर व श्यामसुंदर गुट्टे यांच्या पथकाने आरोपी संजय ला सापळा रचून ताब्यात घेतले आहे.