पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी पकडले. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किंमतीच्या एकूण १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात मौजमजेसाठी ही टोळी दुचाकी चोरी करत होते. समीर सुरेश चव्हाण (वय २२), बिराजी बाळासाहेब रोंगे (वय २३) , दत्ता अशोक शिंदे (वय २३), विजय दत्ता कुऱ्हाडे (वय २०) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सापळा रचून यांना अटक केली.

यातील दत्ता अशोक शिंदे यांच्यावर या अगोदरही चोरीचा गुन्हा दाखल आहे.या चोरट्यांनी पिंपरी, भोसरी, यवत, दिघी या परिसरातील दुचाकी चोरल्या आहेत. चारही आरोपी हे दौंड तालुक्यातील आहेत. या चौघांची एक महिन्यांपूर्वीच मैत्री झाली होती. त्यानंतर ही मंडळी टोळी तयार करुन नियोजनबद्ध चोरी करायला लागले. दरम्यान भोसरी येथे लघुशंकेला बसलेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याने भोसरी पोलिसात तक्रार दिली. याचा तपास करत असताना पोलिसांना या टोळीसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून १९ मे ला राहत्या घरातून चौघांना अटक केली.