हरयाणा येथून विमानाने प्रवास करून पिंपरी-चिंचवडमध्ये एटीएम फोडणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपी हे मूळ हरयाणा येथील असून ते एटीएम फोडण्यासाठी स्थानिक गुन्हेगारांची मदत घेत असत. वाकड पोलिसांनी दहा दिवस हरियाणा येथे राहून वेषांतर करून आरोपीला अटक केली आहे. या घटनांमध्ये सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटली.

अझरुद्दीन ताहीर हुसेन (वय-२९), सुर्रफुद्दीन हसिम (वय-२२), संदीप माणिक साळवे (वय-४३), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय-४२), मोहमद शाकिर हसन (वय-३५), गौतम किसन जाधव (वय-३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एटीएम फोडून त्यातली रक्कम लंपास करण्याच्या घटनांनी कळस गाठला होता. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १५ दिवसात दोन एटीएम मशीन गॅस कटर च्या साहाय्याने फोडण्यात आली. त्यामुळे वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना गुप्त महितीदाराममार्फत माहिती मिळाली की, संबंधित घटनेतील आरोपी हे पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या व्यतिरिक्त आरोपी हे हरयाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांचं पथक हरयाणामध्ये गेले.

दहा दिवस आरोपी असलेल्या ठिकाणी पोलीस अधिकारी वेषांतर करून राहिले. मुख्य आरोपीचा शोध लावला आणि इतर आरोपीना तेथून ताब्यात घेण्यात आले. हरयाणा येथून मुख्यरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान मुख्य आरोपी हा हरयाणा येथून विमानाने पिंपरी-चिंचवड शहरात एटीएम फोडण्यासाठी येत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित आरोपी हे दिवसभर एटीएमची रेकी करायचे आणि ज्या एटीएम सेंटर च्या डसबिनमध्ये जास्त दोऱ्या (नोटा, बंडल ला वापरतात त्या) फेकून दिलेल्या दिसायच्या तिथे हे आरोपी चोरी करत होते. त्याच्याकडून ऐकून तीन लाख रुपयांची रोख रक्कम आणि मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. यांच्यावर इतर राज्यात देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

तर बँक बदलावी….पोलीस आयुक्त

संबंधित बँक एटीएम मशीन ची काळजी घेत नसेल, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक अश्या गोष्टी पुरवत नसतील तर नागरिकांनी बँक बदलावी असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे. दरम्यान, एटीएम, सराफ दुकान आणि इतर संवेदनशील ठिकाणी क्यूआर कोड बसवलं जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. संबंधित बँकांनी वेळीच एटीएम बाबत धडा घेतला नाही तर आरबीआय शी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.