वेगवेगळ्या ऋतूंच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी ८६ कुलर जप्त केले आहेत. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. योगेश बाबाजी पुतमाळी, अजीज बादशाह सय्यद, ज्ञानेश्वर रामराव पल्हाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळा सुरू असून मोठ्या प्रमाणावर कुलर्सची मागणी आहे. याच दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील डिजीवन स्नेहांनजलीचे या शोरूमचे गोडाऊन फोडून तब्बल ९० कुलर चोरट्यानी लंपास केले होते. या प्रकरणी तीन जणांच्या टोळीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८६ कुलर जप्त करण्यात आले आहे.

या सगळ्या कुलर्सची किंमत तब्बल १० लाख रुपये आहे. संबंधित टोळीतील इसमावर पुणे ग्रामीण आणि औरंगाबाद येथे गुन्हे दाखल आहेत. आरोपी योगेश, अजीज आणि ज्ञानेश्वर हे ऋतू बदलला की त्याचप्रमाणे चोरी करत. या चोरट्यांनी पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट चोरल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. तर शंभरपेक्षा अधिक लॅपटॉप चोरले होते. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर  कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कुदळ आणि प्रमोद कदम,हरीश माने यांच्या पथकाने केली.