गणेशखिंड रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून दोन युवतींची सुटका करण्यात आली. युवतींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी दलाल विपुल, कृष्णा सिंग ऊर्फ यादव, वीरू ऊर्फ अजय यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या दलालांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. विपुल वेश्याव्यवसायासाठी युवतींना प्रवृत्त करत होता. ग्राहकांशी तो संपर्क साधायचा तसेच तारांकित हॉटेलमध्ये युवतींना तो पाठवायचा. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना ही माहिती मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी विपुलशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने युवतींना तारांकित हॉटेलमध्ये पाठविले. पोलिसांनी तेथे सापळा लावून दोन युवतींना ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी हडपसर भागातील निरीक्षणगृहात करण्यात आली.

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, ननिता येळे, गीतांजली जाधव, सुप्रिया शेवाळे, रूपाली चांदगुडे, सरस्वती कागणे यांनी ही कारवाई केली.