पौड रस्त्यावर महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरटय़ांना पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून जेरबंद केले. चोरटय़ांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (११ डिसेंबर) रात्री ही घटना घडली.
स्वप्नील सुरेंद्र गायकवाड (वय २३, रा. घोरपडे पेठ ) आणि फैय्याज हनीफ शेख (वय ३०, रा. काची आळी, रविवार पेठ) अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. महिलेने या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही महिला पौड रस्त्यावरून निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेले गायकवाड आणि शेख यांनी तिचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. त्याचवेळी तेथून गस्त घालणारे पोलीस कर्मचारी होगले, शेख आणि नागरिक शंतनू गव्हाणे, राजेंद्र गाचुत्रे यांनी पसार झालेल्या चोरटय़ांचा पाठलाग सुरू केला. पोलीस आणि नागरिकांनी गायकवाड आणि शेख याला पकडले. तेव्हा दोघा चोरटय़ांनी बॅगेतून कोयता काढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
गायकवाड आणि शेख यांनी साखळी चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. सहायक निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 3:25 am