पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील मनुष्यबळ आणि पोलीस ठाण्यांची संख्या कमी आहे. शहराचा विकास वेगाने होत असल्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी नवीन सहा पोलीस ठाणी व मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी राज्यगृहमंत्री रणजित पाटील यांच्याकडे शुक्रवारी केली. पाटील यांनी यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस आयुक्तालयास भेट देऊन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. त्या वेळी पोलीस आयुक्तांनी पुण्यातील प्रश्नांची माहिती देत काही मागण्या केल्या. त्यात प्रामुख्याने सहा पोलीस ठाणी, पोलीस मनुष्यबळ वाढवून द्यावे, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले की, शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. क्रेडाईकडून शहरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुणे परिसरातून नक्षलवाद्यांना अटक केल्यासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, नक्षलवाद्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथक सखोल तपास करीत आहे. त्यांच्या एका विषेश पथकामार्फत पुण्यात तरूणांना आकर्षित केले जात आहे का याचा तपास घेतला जात आहे. राज्यात आर्थिक गुन्ह्य़ांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे आर्थिक गुन्ह्य़ातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्या मालमत्तेतून फसवणूक झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या पंधरा वर्षांतील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी तळोजा कारागृहाला भेट दिल्यानंतर तेथील सात क्रमांकाच्या बराकीमध्ये ७६ क्रमांकाच्या कैद्याकडे तीन मोबाईल मिळाले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, शनिवारी सकाळी येरवडा कारागृहाला भेट दिली. कारागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले. शासानापुढे शहरीकरणाचे मोठे आव्हान आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा झालेला विकास हा अनियोजित असल्याचे परखड मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केले.

वाकोला पोलीस ठाण्यातील घटना वैयक्तिक
मुंबई येथील वाकोला पोलीस ठाण्यात घडलेली घटना ही वैयक्तिक असून पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण असल्यामुळे ती घडली असे म्हणता येणार नाही, असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले. वाकोला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळीबार करून सहायक उपनिरीक्षक शिर्के या कर्मचाऱ्याने गोळी झाडून घेत स्वत: आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर ताणामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा सुरू होती.