गणेशोत्सवात मंडळांना पोलीस आयुक्तांनी वर्गणी देण्याची विलास लांडेंची मागणी, उत्सवकाळातील ओंगळ प्रदर्शनावरून लक्ष्मण जगतापांनी सुनावलेले खडेबोल, फटाके वाजवण्यास महापौरांचे समर्थन, कार्यकर्त्यांच्या तक्रारी व सूचनांचा पाऊस असे चित्र शुक्रवारी थेरगावात दिसून आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस दिवस-रात्र झटत आहेत. मात्र, आरोपी हाती लागत नसल्याचे सांगत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी आरोपींना पकडण्यासाठी मदत करा, असे साकडे मंडळांना घातले.
पोलीस उपायुक्त शहाजी उमापांच्या पुढाकाराने पोळ यांच्या उपस्थितीत मंडळांची बैठक झाली, तेव्हा कार्यकर्त्यांच्या सूचनांचा परामर्श घेत त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोळ म्हणाले, दाभोलकरांच्या हत्येविषयी काही माहिती असल्यास कळवावी. भीती वाटत असेल तर बूथवरून फोन करा, स्वत:चे नाव सांगू नका. मात्र, पोलिसांना मदत करा. पुणे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याने जागरूक राहा, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. लांडे म्हणाले, पोलीसबळ कमी पडत असल्याने ते वाढवण्याची गरज आहे. पोलिसांना कार्यकर्ते नेहमीच मदत करतात, पोलिसांनी मदतीची भूमिका ठेवावी. जगताप म्हणाले, लोकमान्य टिळक असते तर सध्याच्या उत्सवातील ओंगळपणा त्यांनाही आवडला नसता. उत्सवातून समाजप्रबोधन होत आहे का, याचे आत्मपरीक्षण करावे. ‘एक वॉर्ड एक गणपती’ ठेवल्यास प्रोत्साहन म्हणून यंदा २५ लाख व पुढील वर्षांपासून ११ लाख रुपये वर्गणी देऊ. महापौर म्हणाल्या, पालिकेने घाट स्वच्छता सुरू केली असून ३६ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
ग्राहक समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, पक्षनेत्या मंगला कदम, काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी व्यासपीठावर होते. किरण मोटे, तानाजी चांदेरे, शिवदास महाजन, दगडू पाटील, नीलेश पिंगळे, सुनील सामंत आदींनी सूचना केल्या. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, सर्वाना समान वागणूक द्या, पोलीस परवाने वेळेत द्या, उत्सव काळात महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, वीजपुरवठा खंडित न होण्याची खबरदारी घ्यावी, रात्री-बेरात्री फटाके वाजू देऊ नयेत आदींचा त्यात समावेश होता.