पुणे पोलीस आयुक्तालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातच गेल्या काही दिवसांपासून एका श्वानाने मुक्काम ठोकला आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या कार्यालयासमोरच रोज दुपारी हे श्वान चक्क निद्राधीन होते. शेकडो परकीय नागरिक तेथे उपस्थित असतात. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच निद्रा घेणाऱ्या या श्वानाला उठवण्याचा विचार देखील पोलिसांच्या मनात येत नाही; पण कामानिमित्त येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या दृष्टीने श्वानाची वामकुक्षी हा गमतीचा विषय ठरत आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या तळमजल्यावर परकीय नागरिक नोंदणी विभाग आणि विशेष शाखेचे कार्यालय आहे. परकीय नागरिक नोंदणी विभागाचे (एफआरओ) कामकाज शासकीय सुट्टय़ा वगळता दररोज सुरू असते. शेकडो परकीय नागरिक तेथे कामानिमित्त येत असतात. काही वर्षांपूर्वी परकीय नागरिक नोंदणी विभागाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे या विभागाचे कार्यालय चकचकीत झाले आहे. तेथेच पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांकडे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची चौकशी तसेच त्यांचे नाव आणि पत्ता घेऊन तेथून नागरिकांना पहिल्या मजल्यावर प्रवेश देण्यात येतो.
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात कामानिमित्त येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या वाढली आहे. यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या कार्यालयात दररोज परदेशी नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी तळमजल्यावर आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. तेथेच एका धष्टपुष्ट श्वानाने गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकला असून दररोज दुपारी हे श्वान परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या कार्यालयासमोर लोळण घेत असते किंवा झोपी गेलेले असते. परदेशी नागरिकांच्या समोर हे श्वान झोपलेले असते. नागरिकांची मोठी वर्दळ असतानाही हे श्वान झोपलेले असते. त्यामुळे परदेशी नागरिकांच्या दृष्टीने झोपलेले श्वान हा चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे या श्वानाला कोणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न देखील करत नाही. पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी येणारे नागरिक त्याच्या बाजूने स्वागत कक्षाच्या दिशेने जातात. या श्वानाला बंदोबस्तासाठी किंवा संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी ठेवले आहे का, असाही प्रश्न नागरिकांना पडतो. मात्र हे श्वान पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत कसे आले आहे, हे देखील कळलेले नाही.