01 March 2021

News Flash

नवीन वर्षांत हेल्मेट सक्तीवर पोलीस आयुक्त ठाम

नवीन वर्षांत पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शनिवारी स्पष्ट केले.

(संग्रहित छायाचित्र)

सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यकच- डॉ. के. वेंकटेशम

नवीन वर्षांत पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शनिवारी स्पष्ट केले.

सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. नवीन वर्षांत या कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील गंभीर स्वरुपाच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर  नवीन वर्षांत पुणे शहरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी महिन्याभरापूर्वी जाहीर केले होते. पुणे पोलिसांकडून नवीन वर्षांत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत वेंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले,की  हेल्मेटकडे सक्ती म्हणून पाहणे योग्य नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते आहे. पुण्यात देखील रस्ते अपघात वाढत आहेत. महाविद्यालयीन युवक, नोकरदार युवक अपघातात बळी पडले आहेत. हेल्मेट परिधान केल्यास गंभीर स्वरुपाची दुखापत टळू  शकते. पुण्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. ज्या रस्त्यांवर अपघात होतात, त्या भागातील अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

आठ हजारांपेक्षा जास्त ‘कॉल’

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात गेल्या वर्षी (२०१७) गंभीर तसेच किरकोळ स्वरुपांच्या अपघातांची माहिती आठ हजारांहून जास्त नागरिकांनी दिली होती. काही अपघात अगदी किरकोळ स्वरुपाचे होते. मात्र, पुण्यात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी दिली.

नागरिकांच्या सूचना स्वीकारणार

नवीन वर्षांत पुणे पोलिसांकडून नागरिकांशी संवाद वाढविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. या सूचना संकलित करण्यात येतील. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी  उपाययोजना करण्यात येणार आहे. महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 2:01 am

Web Title: police commissioner on the helmets forced in the new year
Next Stories
1 १ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमामध्ये कडेकोट बंदोबस्त
2 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पदसंख्येत वाढ
3 राज्याला थंडीचा तडाखा
Just Now!
X