पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करून घेण्याचे काम करावे, स्वत: न्यायाधीश असल्याप्रमाणे वागू नये. वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर अवैध धंद्यांवर कारवाई होते, तोपर्यंत झोपा काढता का, स्थानिक पातळीवर नागरिकांना न्याय मिळत नाही म्हणून ते वरिष्ठांपर्यंत येतात; असे होता कामा नये. प्रामाणिकपणे काम करा, गुन्हे दाखल करा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, अशा शब्दात पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत शहरातील गुन्हेगारी घटनांची माहिती घेतली. अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीविषयी आलेल्या तक्रारींवरून पोळ यांनी त्यांची चांगलीच हजेरी घेतली. नागरिकांच्या दखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद अदखलपात्र अशी केली जाते. दखलपात्र गुन्ह्य़ांबाबत फिर्यादीकडून अर्ज मागवले जातात. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना न्यायालयात तक्रार दाखल करा, असे सांगितले जाते. न्यायालयातून १५६ (३) चा आदेश आणण्यास भाग  पाडले जाते. काही पोलीस अधिकारी न्यायाधीशांप्रमाणे न्यायनिवाडा करतात. पोलीस ठाण्याच्या पातळीवर गुन्हे दाखल होत नसल्याने अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होते. त्यामुळे न्यायासाठी ते थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे येतात. अशाप्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यातच वरिष्ठांचा वेळ खर्ची होतो. त्याचप्रमाणे, न्यायालयाकडून आदेश आल्यानंतरही काही अधिकारी सोईनुसार त्याची प्रथम खबरी अहवालात (एफआयआर) नोंद करत नाहीत. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या नावाखाली प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात. अनेकदा गुन्ह्य़ात कोणीतरी ‘वजनदार’ व्यक्ती नाही ना, हे पाहून गुन्हा दाखल करायचा की नाही, हे ठरवले जाते. यापुढे अशाप्रकारची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम करा, असा सज्जड दमही आयुक्तांनी भरला. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पोलीस आयुक्तालयात येत आहेत. त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घालून अवैध धंद्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी बजावले. अन्यथा, कठोर कारवाई करू, असा इशारा पोळ यांनी या वेळी दिला.