आत्महत्या करीत असल्याची माहिती फेसबुकवर टाकल्यानंतर बेपत्ता झालेला चिंचवडमधील महाविद्यालयीन विद्यार्थी तीन दिवसांनंतर रविवारी सकाळी परतला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, तो कुठे गेला होता याची माहिती पोलीस घेत आहेत.
अभिजित भगवान व्यवहारे (वय २२, रा. चिंचवड ) असे परतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हा आकुर्डी येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. तो तेथून बुधवारी रात्री काही पुस्तके घेऊन बाहेर पडला. त्याने जाताना मित्रांना, अभ्यास करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने फेसबुकवर ‘आपण हे जग सोडून जात आहोत,’ असे दोन संदेश टाकले होते. तसेच, आई-वडिलांना उद्देशून एक संदेशही टाकला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, तो मिळत नव्हता. अभिजित हा रविवारी पहाटे त्याच्या नगर जिल्ह्य़ातील वडगाव गुप्ता या मूळगावी परतला.
याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान साळुंके यांनी सांगितले, की अभिजित परत आल्याची माहिती त्याच्या वडिलांनी रविवारी सकाळी कळविली. अभिजित याची मन:स्थिती ठीक नसल्यामुळे तो कोठे गेला होता याची त्याने माहिती दिलेली नाही. तो बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जाईल.