नीलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे खूनप्रकरणी कुख्यात गज्या मारणे व रुपेश मारणे या दोघांना प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या दोघांना शनिवारी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बधे खूनप्रकरणात पनवेल न्यायालयातून ताब्यात घेतले होते. बधे खूनप्रकरणामध्ये चार पिस्तुलांचा आरोपींनी वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
 वैकुंठ स्मशानभूमीजवळ अमोल बधेसह तिघांवर २९ नोव्हेंबर रोजी मारणे व त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. यामध्ये बधेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तेराजणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मारणे टोळीचा प्रमुख असलेला गज्या मारणे व मुख्य सदस्य रुपेश मारणे, सागर राजपूत हे फरार होते. त्यांच्या मागावर शहर व ग्रामीण पोलीस होते. या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर शत्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पनवेल न्यायालयाने त्या गुन्ह्य़ात त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले.
फरार असताना दोघे आरोपी हे पुणे जिल्हा आणि राज्याबाहेर गेल्याचे सांगत आहेत. फरार असताना त्यांना कोणी मदत केली. हा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी चार पिस्तुलांचा वापर केला आहे. ती जप्त करायची आहेत. टोळीच्या वर्चस्वातून त्यांनी आणखी कोठे शस्त्राचा साठा करून ठेवला आहे का याबाबत तपास करायचा आहे, फरार आरोपींना अटक करायची आहे, यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.