विसर्जन मिरवणुकीत गोंधळ; पोलिसांकडून मंडळांवर गुन्हे दाखल

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून ध्वनिवर्धक यंत्रणेवर कारवाई करण्यात येत असताना गोंधळ घातल्याप्रकरणी तीन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड तसेच लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारूती चौक येथे या घटना घडल्या.

गणेश पेठेतील श्रीकृष्ण मंडळ विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सोन्या मारूती चौकात सकाळी साडेसहाच्या सुमारास आले. त्या वेळी मंडळाने मोठय़ा आवाजात ध्वनिवर्धकावर गाणी लावली होती. पोलिसांनी ध्वनिवर्धक बंद करण्यास सांगितले असता कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोपळे यांच्यावर मंडळाचे कार्यकर्ते धावून गेले. पोलिसांच्या कारवाईला विरोध करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांकडून श्रीकृष्ण मंडळाचे पदाधिकारी तसेच आठ ते दहा कार्यकर्त्यांविरूद्ध ध्वनिप्रदूषण कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. भोपळे यांनी यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करत आहेत.

कोथरूड भागातील मयूर कॉलनीत असलेल्या गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर मोहोळ यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रस्ता भागातील बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष अमरीश शिंदे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. न्यायालयाचा आदेश न पाळता ध्वनिवर्धकांचा वापर केल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी दोन मंडळांविरूद्ध कोथरूड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवाजीनगर येथील  वेधशाळा चौकातील पोलीस चौकीच्या परिसरात गोंधळ घातल्याप्रकरणी एका मंडळाच्या ४० ते ४५ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पोलिसांना शिवीगाळ केल्याचे पोलीस शिपाई अविनाश पुंडे यांनी  फिर्यादीत म्हटले आहे.