“पुण्यातील शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधून माझी मुलगी बेपत्ता झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे काही माहिती नाही. माझी मुलगी मिळाली पाहिजे.” अशी मागणी करत दोन दिवसांपूर्वी बेपत्ता महिलेची आई कोविड सेंटर बाहेर आंदोलनास बसली होती. त्या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांना बेपत्ता महिलेचा शोध लावण्यात यश असून ही महिला पिरूगुट येथे सापडली आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, प्रिया गायकवाड ही महिला २९ तारखेला शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यानंतर त्या महिलेच्या आईने १३ सप्टेंबर रोजी आमच्याकडे तक्रार केली की, कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी उपचार घेत होती. मात्र आजअखेर ती सापडत नाही आणि मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यांची तक्रार दाखल करून, संबधित महिलेचे फोटो शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले. त्यानंतर आमच्या बातमीदाराच्या मार्फत पिरूगुट येथे एक महिला नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, संबधित महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.