पुणे पोलिसांचा ‘सेवा’ प्रकल्प; फेरतक्रारींचा थेट अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा

पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना बरेवाईट अनुभव येत असतात. पोलीस तक्रार ऐकतात, पण पुढे काय होते, याची माहितीही मिळत नाही. यावर उपाय म्हणून पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा’(सव्‍‌र्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टिम असिस्टन्स) या योजनेमुळे सामान्यांच्या तक्रारींचे निराकरण होण्यास सुरुवात झाली आहे. एखाद्या नागरिकाने पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल असमाधान व्यक्त केले तर त्याचा पाठपुरावाही केला जात आहे.

पुणे शहरातील ३० पोलीस ठाण्यांत ‘सेवा’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली असून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. काही तरी काम घेऊन येणाऱ्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात या योजनेत एक टॅब देण्यात आला आहे. या टॅबमध्ये पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रारअर्ज, तक्रारादाराची माहिती नोंदवून घेतात. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही माहिती भरून घेतल्यानंतर ती मुख्य नियंत्रण कक्षातील प्रणालीत पाठविली जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी तक्रारदाराशी संपर्क साधतात. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले किंवा नाही, याबाबत विचारणा केली जाते. तक्रारदाराने असमाधान व्यक्त केले तर तक्रार सोडविण्यासाठी पुन्हा पाठपुरावा केला जात आहे. ‘सेवा’ प्रकल्प सुरू झाल्यापासून शहरातील १६ हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे.

त्यापैकी फक्त २१० नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल असमाधान व्यक्त केले, असे या प्रकल्पाचे समन्वयक अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी  यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त दीपक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे.

‘सेवा’ प्रकल्पात नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल एखाद्याने असमाधान व्यक्त केले, तर त्याचाही पाठपुरावा केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याशी व्यक्तिगत संपर्क साधण्यात येतो आणि त्याला तक्रारीचे निराकरण करण्याबाबत पाठपुरावा क रण्याच्या सूचना दिल्या जातात. काही तक्रारी पोलिसांच्या कक्षेबाहेरील असतात. अशा परिस्थितीत संबंधित तक्रारदाराला कायदेशीर सल्ला घेण्याच्या सूचना देण्यात येतात.

– डॉ. के. वेंकटेशम, पुणे पोलीस आयुक्त