नगरसेवकाच्या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षकाची मद्यसेवन चाचणी!

जंगली महाराज रस्त्यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोटारीवर कारवाई केल्यानंतर बालवडकर यांनी कारवाई करणारे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी मद्यसेवन केल्याची तक्रार केली. त्या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक डामसे यांना शिवाजीनगर वाहतूक शाखेत बोलावून बालवाडकर यांच्यासमोर मद्यसेवन चाचणी घेण्यात आली. दरम्यान, कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने पोलीस दलातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जंगली महाराज रस्त्यावर मोटार उभी केल्यानंतर रविवारी (९ एप्रिल)नगरसेवक अमोल बालवडकर आणि त्यांचा मोटारीचा चालक गणेश वसंत चौधरी (दोघे रा. बालेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कारवाई सुरु असताना बालवडकर यांनी वाहतूक शाखेच्या वारजे विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी पोलीस निरीक्षक डामसे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. बालवडकर माझे मित्र आहेत. त्यांच्या मोटारीवर कारवाई करु नका, असे त्यांनी डामसे यांना सांगितले. हा सर्व प्रकार सुरु असताना बालवडकर यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक डामसे यांनी मद्यसेवन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करा, असे बालवडकर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले, असे डामसे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. या घटनेनंतर वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्त प्रीती टिपरे यांनी तातडीने मला शिवाजीनगर वाहतूक शाखेत बोलावून घेतले. बालवडकर यांच्या तक्रारीवरुन माझी सर्वांसमक्ष मद्यसेवन चाचणी करण्यात आली. एकप्रकारे मला दिलेली ही अपमानास्पद वागणूक आहे, असे डामसे यांनी अर्जात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक डामसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी याप्रकाराविषयी भाष्य करण्यास नकार दिला.