पुण्यातील प्रकार, नाटय़संघाची तक्रार

पुणे : नाटय़प्रयोगासाठी आलेल्या मुंबईच्या नाटय़संघाला स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुण्यात विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. या नाटय़संघातील एका मुस्लीम तरुणाची चिंचवड येथील हॉटेलमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मुस्लीम आडनावामुळे त्याची चौकशी करण्यात आल्याचा आरोप नाटय़संघाने केला आहे.

मुंबईतील ‘किस्सा कोठी’ या नाटय़संस्थेच्या ‘रोमिओ रविदास ज्युलिएट देवी’ या नाटकाचा १४ आणि १५ ऑगस्टला अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सुदर्शन रंगमंच येथे प्रयोग होता. या नाटय़संघात शर्मिष्ठा साहा, दिलीपकुमार पांडेय, अमित कुमार, प्रियांका चरण आणि यश खान यांचा समावेश आहे. ठरल्याप्रमाणे १५ ऑगस्टला सुदर्शन रंगमंच येथील प्रयोग झाल्यानंतर नाटकाचा चमू चिंचवड येथील हॉटेलमध्ये पोहोचला होता.

‘आम्ही नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर हॉटेलवर जाऊन झोपलो होतो. पोलीस रात्री अडीचच्या सुमारास आले. त्यांनी यश खान कोण आहे असे विचारले. त्यानंतर ओळखपत्र दाखवण्यास सांगितले.

आमचे साहित्य पाहून यात काय आहे ते दाखवा, पुण्यात काय करताय, एकमेकांना कसे ओळखता अशी सगळी चौकशी त्यांनी केली. काही आक्षेपार्ह न सापडल्याने ते निघून गेले.

आम्ही ही तपासणी-चौकशी कशासाठी हे विचारले. त्याचे त्यांनी उत्तर दिले नाही,’ असे यशने सांगितले.   ‘आम्ही कलाकार आहोत, नाटकाच्या प्रयोगासाठी आल्याचे पोलिसांना सांगत होतो. मात्र, वॉरंट नसतानाही त्यांनी खोलीत येऊन चौकशी केली, ओळखपत्र आणि आमच्या अन्य साहित्याचीही तपासणी केली. केवळ हिंदू नाव, मुस्लीम आडनाव असल्यानेच यश आणि आम्हाला लक्ष्य करण्यात आले. अशा पद्धतीने चौकशी करणे चुकीचे आहे. हॉटेल प्रशासनानेही आम्हाला चौकशी होणार असल्याबाबतची पूर्वकल्पना दिली नाही. पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरोधात आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत, पोलिसांनी माफी मागितली पाहिजे,’ असे नाटकाच्या दिग्दर्शिका शर्मिष्ठा साहा म्हणाल्या.

वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी

स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर हॉटेलची तपासणी करण्यात आली. आम्हाला जे संशयास्पद वाटले, त्यांना तपासण्यात आले. वरिष्ठांकडून तसे आदेश देण्यात आले होते, असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.