पुणे, पिंपरी-चिंचवडसह करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणावर ग्रामीण परिसरात देखील आहे. त्यामुळे पोलीस रात्रं-दिवस रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावत आहेत. परंतु, काही नागरिक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं वारंवार दिसत आहे. खेडमध्ये आज काही व्यक्ती मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडले. तेव्हा, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी त्यापैकी एकाला व्यक्तीला हात जोडले आणि आमच्यावर व समाजावर एक उपकार करा तुमच्या अशा फिरण्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशी समज देऊन त्यांनी गांधीगिरी करत समजवण्याचा प्रयत्न केला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अक्षरशः करोनाने थैमान घातले आहे. ग्रामीण परिसरात देखील त्याचा परिणाम जाणवत असून करोनाचा काहीसा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण परिसरात त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. परंतु, काही नागरिक विनाकारण बाहेर पडतात. आज सकाळी देखील असा प्रकार पाहायला मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह परिसरात गस्त घालत होते. तेव्हा, त्यांना एक व्यक्ती मॉर्निंगवॉकसाठी बाहेर दिसला त्या व्यक्तीला वाकून हात जोडत आमच्यावर आणि समाजावर एक उपकार करा, अशी त्यांनी विनंती केली.

तुमच्या अशा फिरण्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुमच्या सोबत करोनाचे विषाणू घेऊन जात आहात. तुम्ही घरी सुरक्षित बसा. कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घ्या. प्रशासनाने जे नियम सांगितलेले आहेत त्याचे पालन करा, असे सांगत गांधीगिरी केल्याच पाहायला मिळालं. पोलीस देखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देऊन देऊन थकले आहेत. त्यामुळे आता गांधीगिरीचा पर्याय निवडत असून सोयीस्कर अपमान केल्याने तरी नागरिक बाहेर निघणार नाहीत अशी शक्कल लढवताना दिसत आहेत.