12 August 2020

News Flash

मावळात वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर

पर्यटनस्थळ बंदीची कडक अंमलबजावणी

पर्यटनस्थळ बंदीची कडक अंमलबजावणी

लोणावळा : मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे, लोणावळा, खंडाळा परिसरात पोलिसांना चुकवून वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळे बंद ठेवण्याबाबत दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पर्यटकांची संख्या जास्त आहे.

पावसाळ्यात दर शनिवारीआणि रविवारी पुणे-मुंबईतील पर्यटकांची उच्चांकी गर्दी लोणावळा, खंडाळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर होत असते. यंदाच्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोणावळा परिसरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले भुशी धरण दोनच दिवसांपूर्वी भरले. मात्र, तेथे जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याने भुशी धरण परिसरात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. लोणावळा शहरात येणाऱ्या मार्गावर खंडाळा, वळवण येथे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. भुशी धरण, लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर रायवुड कॉर्नर, नौसेना बाग येथे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. मळवली रेल्वे स्थानकातून भाजे लेणी, पाटण लेणी, लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. पवनानगर भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असून अंदर मावळात जाणारे रस्ते पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. लोणावळा शहर, ग्रामीण भाग, कामशेत, वडगाव भागातही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या मावळातील सर्व पर्यटनस्थळांवर शुकशुकाट आहे.

दरम्यान, लोणावळ्यात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी पावसाळ्यात मावळातील सर्व पर्यटनस्थळांवर बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. काही पर्यटक बंदी झुगारून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मावळातील ३१ पर्यटनस्थळांवर बंदी

मावळ तालुक्यातील ३१ ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्याचे आदेश मावळचे प्रांतधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत. टाकवे बुद्रुक, वडेश्वर, नागाथळी, वहानगाव, कुसवली, बोरवली, डाहुली, सावळा, कुसुर, निळशी, खांड, राजमाची किल्ला, फणसराई, उधेवाडी, जांभवली, भुशी धरण परिसर, पवना धरण, तुंगार्ली, राजमाची, मंकी हिल पॉइंट, खंडाळा, घुबड तलाव, नागफणी कुरवंडे, घोरावडेश्वर डोंगर, श्री एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगाव, विसापूर, तुंग, तिकोना किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट  या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी पर्यटक पोहोचू  शकणार नाहीत, याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पर्यटनबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, आदेशाचे पालन न करणे (भादंवि १८८) अनुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

– संदेश शिर्के, प्रांताधिकारी, मावळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:24 am

Web Title: police keep close eye on tourists coming in lonavla khandala area zws 70
Next Stories
1 Coronavirus : जुलैअखेर पुण्यात २० हजार रुग्णांची शक्यता
2 नोकरी सोडून घरपोच तयार पीठ पोहोचवण्याचा अभियंत्याचा व्यवसाय
3 Coronavirus : रुग्ण बरे होण्याचे पुण्यातील प्रमाण राज्यात सर्वाधिक
Just Now!
X