पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक दळवी (२९) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. मयत अभिषेकचे वडील अजित दळवी हे सांगली जिल्ह्यात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. दरम्यान अभिषेकने आत्महत्येपूर्वी मद्यपान केले होते अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी परिसरात मयत अभिषेक हा आई आणि पत्नीसह राहत होता. तर वडील अजित दळवी हे नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात असतात. दरम्यान, एक वर्षापूर्वी अभिषेकचं लग्न झालं होतं. मध्यरात्री अभिषेकने मद्यपान केलं होतं. त्यानंतर त्याने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेत गळफास घेतला.

आई आणि पत्नी यांनी दरवाजा उघडण्याची विनवणी केली तरीदेखील अभिषेक दरवाजा उघडत नव्हता. अखेर शेजारी राहणाऱ्या अभिषेकच्या चुलत भावाला बोलावण्यात आलं. त्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला असता अभिषकने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. अद्याप अभिषेकने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.