नागपूरमध्ये नियुक्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची पुण्यात बदली

पुणे : पुणे शहर तसेच ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहखात्याने दिले. नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुण्यात नेमणूक करण्यात आली असून पाटील यांना पुणे ग्रामीण पोलीस दलाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांना देण्यात आली. बोडखे आणि पाटील यांनी नक्षलग्रस्त भागात काम केले आहे. नक्षलग्रस्त भागातील त्यांचे काम आणि अनुभव विचारात घेऊन या दोघांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी अनुक्रमे बोडखे आणि पाटील यांची नेमणूक करण्यात आली. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामाचा अनुभव मोठा आहे. गडचिरोली भागात सुवेझ हक आणि संदीप पाटील यांनी प्रभावी कामगिरी केली होती. पुण्याचे नवनियुक्त सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे हे मूळचे अहमदनगर जिल्हय़ातील आहेत. बोडखे यांनाही नक्षलग्रस्त भागात काम करण्याचा अनुभव आहे. बोडखे नक्षलविरोधी पथकात कार्यरत होते.  कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, रोना विल्सन, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत यांना अटक केली. नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना मुंबई, दिल्ली, नागपूर येथून ताब्यात घेतले होते. या कारवाईत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे कार्यालयाच्या पोलीस अधीक्षकपदी नागपूरमधील पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. परदेशी यांनी यापूर्वी पुण्यात काम केले होते.

शहरी नक्षलवादाचा चेहरा

गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि मुंबई शहरात नक्षलवादी कारवाया छुप्या पद्धतीने सुरू आहेत. शहरी भागात नक्षलवादी कारवाया सुरू असल्याने पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वांच्या शहरात प्रामुख्याने नक्षलवादी भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याचे धोरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नक्षलग्रस्त भागातील कामाचा अनुभव पाठीशी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली पुण्यात केल्यामुळे त्याचा निश्चित फायदा होणार आहे.