सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना मदत करणं सांगवी पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. यात पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलला सलग्न करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली. ते प्रथमदर्शी खात्याअंतर्गत चौकशीत दोषी आढळले असून आणखी सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात राहत्या ठिकाणाहून सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली होती. परंतु, त्यांना सांगवी पोलीस चौकीत आणताच शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत सोडण्यात आल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले होते. मात्र, सांगवी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असल्याने याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार खात्या अंतर्गत चौकशीत तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे दोघेही दोषी आढळले असून त्यांच्यावर आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? 

भाजपाचे सोलापूर येथील उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना सांगवी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तसंच या प्रकरणी नीता सुरेश लोटे, एका बँकेचे तत्कालीन बँक मॅनेजर यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे. काळे व त्यांच्या अन्य साथीदारांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सदनिका (फ्लॅट) अनेकांना विकून आर्थिक फसवणूक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात येऊन येथील विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली होती. परंतु, त्यांना दुसऱ्याच दिवशी त्यांना अचानक शिंका आणि खोकला येत असल्याने नोटीस बजावत सोडून देण्यात आले होते. त्यामुळे तपास अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आल्याने अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.