गणेशोत्सवाच्या धर्तीवर शहरात लावण्यात आलेला बंदोबस्त आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन यामुळे मराठा क्रांती मोर्चासाठी लाखो समाजबांधव आल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार रविवारी सुरळीत पार पडले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर सायंकाळपर्यंत शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मोर्चात सहभागी झालेले नागरिक आाणि स्वयंसेवकांनी पोलिसांना सहकार्य केल्यामुळे दुपारी दोननंतर शहरातील सर्व रस्ते वाहतुकीला खुले झाले आणि व्यवहारही सुरळीत झाले.

मराठा क्रांती मोर्चासाठी पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील विविध भागांतून मोठय़ा संख्येने लोक येतील, असा अंदाज पोलिसांना होता. पुणे शहरातील मोर्चाचा दिनांक जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चाच्या संयोजकांसोबत एक बैठकही घेतली होती. संयोजकांनी मोर्चाच्या नियोजनासाठी पाच हजार स्वयंसेवकांची नेमणूक संपूर्ण मार्गावर केली होती. उपनगर तसेच जिल्ह्य़ातून येणाऱ्या नागरिकांसाठी शहरातील मध्य भागापासून काही अंतरावर असलेल्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या मैदानांवर वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी वाहने तेथे लावली. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर मध्य भागातील रस्ते तातडीने खुले करण्यात अडथळे आले नाहीत.

मोर्चाच्या मार्गावर ध्वनिवर्धक यंत्रणा होती. तसेच चाळीस रिक्षांवरही ध्वनिवर्धक यंत्रणा लावण्यात आल्यामुळे नागरिकांना सूचना देणे शक्य झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चा विधानभवन परिसरात पोहोचल्यानंतर मोर्चात सहभागी झालेले नागरिक परतण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकाच भागात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली नाही. सकाळी नऊनंतर लक्ष्मी रस्ता, फग्र्युसन रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता तसेच टप्याटप्याने लष्कर भागातील रस्ते बंद करण्यात आले. दुपारी दोननंतर सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली नाही.

पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

पोलिसांनी बंदोबस्ताची पूर्वतयारी व नियोजनबद्ध आखणी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात लावण्यात आला होता. टिळक चौकात तात्पुरता पोलीस नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण मोर्चा मार्गावर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. उंच इमारतींच्या छतावर पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच २३ ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सकाळी सहा वाजल्यापासून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांचे चोख नियोजन ठिकठिकाणी दिसत होते.