कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याजवळच गावठी दारूची भट्टी लावण्यात आली होती. या ठिकाणी िहजवडी पोलिसांनी छापा टाकला व ही भट्टी उद्ध्वस्त केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बाळू मारुती पवार (वय ३२), समाधान संदीपान अडागळे (वय २१), कुणाल नवनाथ चव्हाण (वय २०, तिघे रा. चिंचवड), सुखदेव राजाराम कापसे (वय २०, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी), विनोदकुमार रामदुलाल पटेल (वय ३०, रा. चिखली) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस नाईक किरण पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बाळू पवार हा त्याच्या साथीदाराच्या मदतीने कारखान्याजवळ गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पहाटे त्या ठिकाणी छापा टाकला. दारूची भट्टी उद्ध्वस्त करण्याबरोबरच पोलिसांनी या भट्टीशी संबंधित आरोपींना अटक केली. आरोपींकडून एक मारुती मोटार व दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.