िपपळे सौदागर परिसरातील ‘टीम लक लक’ या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर रविवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. नऊ तरुणींसह १५ जणांना पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता सर्वाची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली. पिंपळे सौदागर भागातील उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या या हॉटेलच्या आजूबाजूला दाट झाडी आहे. त्यामुळे आत नेमके काय चालले आहे, हे बाहेरून सहसा दिसत नाही. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत पाटर्य़ा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारीही रात्री उशिरापर्यंत हुक्का व मद्याची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एकच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये तरुण- तरुणींचा धिंगाना सुरू होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात िहजवडी, तळवडे, हडपसरमधील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व काही विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वाची यशवंतराव चव्हाण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रत्येकी पाचशे रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांनी सुटका केली.