हडपसर येथील मगरपट्टा सिटी परिसरात एका इमारतीतील सदनिकेत सुरू असलेल्या बडय़ा जुगारअड्डय़ावर विशेष शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत तेराजणांना अटक करण्यात आली असून रोकड, जुगार खेळण्याचे साहित्य असा दोन लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
संजय दत्तात्रय मगर (वय ४९, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर), मंदार महंत जक्कल (वय ३८, रा. साईराम सोसायटी, धानोरी), नितीन मोहनलाल धिया (वय ४७, रा. लॅबरीयम पार्क, मगरपट्टा सिटी, हडपसर), निखील संदेश पराडकर (वय २८, रा. परमारनगर सोसायटी, वानवडी), सुनीलकुमार प्यारेलाल सोने (वय ५१, रा. लक्ष्मी सोसायटी, विश्रांतवाडी), गगनसिंग बिरसिंग थापा (वय ४०, रा. भोसले गार्डन, हडपसर), अभय मधुकर साळी (वय ४१, रा. परमारनगर, वानवडी), व्यंकटरामा शेट्टी (वय ३३, रा. मगरपट्टा सिटी), राहुल साहेबराव चौधरी (वय ४५, रा. कल्याणीनगर), सुरेंद्र तीर्थनारायण बिजुले (वय ४६, रा. भोसले गार्डन, हडपसर), लेखराज परमानंद भट (वय २१), शिवराज देवदत्त भट (वय ३०, दोघे रा. गणेश अपार्टमेंट, हडपसर), मंगेश विनायक खेडेकर (वय ३४, रा. सातवनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मगरपट्टा सिटी परिसरात असलेल्या लॅबिरियम पार्क इमारतीत असलेल्या एका सदनिकेत जुगारअड्डा चालविला जात असल्याची माहिती विशेष शाखेच्या पथकाला शनिवारी (२१ मे) सायंकाळी मिळाली. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जरग आणि त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तेराजणांना अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.