पुण्यातील उंड्री येथे काल रात्रीच्या सुमारास दोन वर्षाच्या चिमुरड्याच्या अपहरणाची घटना घडली होती. या चिमुरड्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची मागणी केली होती. मात्र पोलिसानी उंड्री परिसरात तपास करीत केवळ 11 तासाच्या कालावधीत चिमुरड्याला सापडण्यात यश आले. मात्र अद्यापही आरोपी फरार आहेत. पुष्कराज धनवडे वय दोन वर्ष असे चिमुरड्याचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील वडाची वाडी परिसरात दोन वर्षाचा पुष्कराज धनवडे हा काल रात्रीच्या सुमारास खेळत होता. काही वेळामध्ये तो गायब झाला झाल्याचे समोर आले. त्यावर घरातील सर्व मंडळीनी त्याचा शोधा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्याच दरम्यान बंगल्याच्या आवारात असलेल्या दत्त मंदिराजवळ एक बिस्किटचा पुडा होता. त्याच्या खाली एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये फोन नंबर लिहून ठेवला होता. त्या नंबरवर पुष्कराजच्या काकांनी फोन केल्यावर अपहरण कर्त्यानी 10 लाखांची मागणी केली आणि नाशिक येथे येण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे पुष्कराजचे वडिल सोमनाथ धनवडे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत अपहरण झाल्याची तक्रार दिली.

त्यानंतर उंड्री मधील प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उंड्री सेक्टर 49 मध्ये पहाटेच्या सुमारास शोध घेत असताना. तीन बंगले होते. त्या बंगल्या च्या आतील बाजूस पाहणी सुरु असताना. तेव्हा एका बंगल्यामध्ये कोणी तरी असल्याचे दिसून आले. त्या बंगल्याच्या आत प्रवेश केला असता बंगल्याच्या तारेच्या कंपाऊंडवरुन एक जण पळून गेला. तर आतमध्ये जाऊन पाहिल्यावर पुष्कराज असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले. तर पुष्कराजला आई आणि वडिलां कडे सुपूर्द केले आहे.