पुणे :  उत्तरप्रदेशातील मजूर दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी गहाळ होताच पोलिसांनी क्षणाचा वेळ न लावता तिचा शोध घेण्याची कौतुकास्पद घटना पुणे स्टेशनमध्ये घडली. हडपसर-पुणे  बस प्रवासात ही पिशवी गहाळ झाली होती.   पोलिसांमधील माणुसकी पाहून या दाम्पत्याला गहिवरून आले.

मंगळवारी सायंकाळी पुणे स्टेशनहून पुणे ते बस्ती दरम्यान विशेष श्रमिक गाडी रवाना होणार होती. उत्तरप्रदेशातील दाम्पत्य अशोक कुमार, त्यांची पत्नी पूनम आणि दोन मुली गावी रवाना होणार होते. पुणे स्टेशनच्या आवारात आल्यानंतर गडबडीत पीएमपी बसमध्ये सोन्याचे दागिने असलेली पिशवी विसरल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशोक कुमार आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. तेथे बंदोबस्तास असलेले पोलीस नाईक किरण बरडे, मच्छिंद्र धापसे यांनी पीएमपी बस कोठे गेली,

याबाबतची चौकशी केली. तेव्हा बस हडपसर आगाराकडे पुन्हा रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दुचाकीवरून त्यांनी हडपसर आगार गाठले. तेथे गहाळ झालेली पिशवी शोधली आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनिटांत दोघे जण पुन्हा रेल्वे स्टेशनवर पोहोचले. पिशवी परत केल्यानंतर मजूर दाम्पत्याने मनापासून त्यांचे आभार मानले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचेही त्यांनी कौतुक केले.