शहरातील सर्व पुलांवर अहोरात्र पोलीस बंदोबस्त

पुणे : खडकवासला धरणसाखळीत संततधार पाऊस सुरू असून मुठेला आलेला पूर पाहण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सर्व पुलांचा ताबा गर्दीने घेतला आहे. सर्वाधिक गर्दी डेक्कन भागातील गाडगीळ पुलावर (झेड ब्रीज) होत असून तेथे पोलिसांनी आठवडय़ांपूर्वी वाहने लावण्यास मनाई करणारे फलक लावले आहेत. वाहतूक पोलिसांनी पुलांवर वाहने लावण्यास मनाई केली असून कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सध्या सर्व पुलांवर बेशिस्तीने वाहने लावण्यात येत असल्याने पुलांवर वाहतूक कोंडी आणि गोंधळ होत आहे.

शहरात पंधरवडय़ापासून पावसाने जोर धरला असून खडकवासला धरणसाखळीत पाऊस सुरू आहे. धरणसाखळीतील सर्व धरणे शंभर टक्के  भरल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दुथडी भरून वाहणारी मुठा नदी पाहण्यासाठी नागरिक गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुलांवर सहकु टुंब गर्दी करत आहेत. पुलांच्या दोन्ही बाजूंना तसेच थेट पुलांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत शहरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, संभाजी पूल, गाडगीळ पूल, डेंगळे पूल, शिवाजी पूल, एस. एम. जोशी पूल, म्हात्रे पूल, राजाराम पूल या पुलांवर गर्दी असते. शहरातील सर्व पुलांचा ताबा गर्दीने घेतला असून पुलांना पर्यटनस्थळांचे रूप आले आहे.

पुलांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पुलांच्या दुतर्फा वाहने लावण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. डेक्कन वाहतूक पोलिसांनी आठवडय़ापूर्वी ‘झेड ब्रीज’वर  वाहने लावण्यास मनाई करणारे फलक  लावले आहेत, असे डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

फेरीवाल्यांना बंदी

चार दिवसांपासून मुठा नदीत मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी अनेकजण सहकुटुंब गर्दी करत आहेत. नागरिकांनी आनंद लुटावा मात्र पुलांवर गोंधळ घालू नये. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. अनुचित घटना टाळण्यासाठी सध्या डेक्कन भागातील सर्व पुलांवर दिवसा आणि रात्री देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फेरीवाले, कणीस विक्रेते यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.