हडपसर भागात व्यावसायिकांकडून रोकड जप्त

हडपसर भागात काळ्याचे पांढरे करण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघा व्यावसायिकांना पोलिसांनी शनिवारी (२६ नोव्हेंबर) पकडले. दुचाकीच्या डिक्कीत दडवलेली पंचवीस लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. पोलिसांनी आयकर विभागाला ही माहिती दिली आहे.

निर्मल किरण हिरण (जैन) (वय ३६, रा. शांतिनगर हाऊसिंग सोसायटी, कोंढवा) आणि आशिष माणिक चंद सोळंकी (वय ३६, रा. पद्मजी पॅलेस, भवानी पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पंचवीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चौकशीनंतर दोघांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. उद्या (२८ नोव्हेंबर) त्यांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे तसेच जप्त करण्यात आलेली रोकड आयकर विभागाकडे सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली.

हडपसर भागातील ससाणेनगर येथे शनिवारी दुपारी चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन दोघेजण येणार आहेत. एका एजंटाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्याआधारे पोलिसांनी ससाणेनगर भागात सापळा लावला. दुचाकीस्वार निर्मल जैन आणि आशिष सोळंकी तेथे आले. पोलिसांनी त्यांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी दुचाकीची पाहणी केली. तेव्हा डिक्कीत चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा राजू नावाच्या एजंटाच्या माध्यमातून नवीन चलनातील नोटा मिळणार होत्या. त्याबदल्यात त्याला काही कमिशन देण्यात येणार होते, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, सहाय्यक निरीक्षक अमोल गवळी, पोलीस नाईक मुलाणी, धावटे, गायकवाड यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आठवडाभरात वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत काळ्याचे पांढरे करणाऱ्या व्यावसायिकांकडून अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.