पोलिसांकडून ५ हजार किलो खवा जप्त

गणेशोत्सवात गुजरातमधील भेसळयुक्त खवा विक्रीस पाठवला जात असून, आठवडय़ापूर्वी गुन्हे शाखेने दोन हजार किलो भेसळयुक्त खवा पकडला होता. त्यानंतर खासगी प्रवासी बसमधून पुण्यात विक्रीस पाठवलेला ४ हजार ८५२ किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी भेसळयुक्त खव्याची वाहतूक करणारी आराम बस जप्त केली आहे, तसेच बसच्या चालकासह तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

खासगी प्रवासी बसमधून गुजरातमधील भेसळयुक्त खवा विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवला जात असल्याची माहिती वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस नाईक शंकर संपत्ते यांना खबऱ्याने दिली. नीता ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस स्वारगेट भागात आल्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी सुरू केली. गाडीतील सामान ठेवण्याच्या कप्प्यात खवा ठेवल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. अधिकाऱ्यांनी खव्याची तपासणी केली. तेव्हा हा ४ हजार ८५२ किलो खवा भेसळयुक्त असल्याचे उघड झाले.

खासगी आराम बसचा चालक हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (वय ४५, रा. अहमदाबाद, गुजरात) याच्यासह तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक लगड, हवालदार सुनील पवार, शंकर संपत्ते, जितेंद्र तुपे, मोहन येलपले यांनी ही कारवाई केली. या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी एस. पी. शिंदे, सहायक आयुक्त पी. टी. गुंजाळ, म्हस्के यांनी साहाय्य केले.

गणेशोत्सवात सर्वाधिक भेसळयुक्त खवा बाजारात

गणेशोत्सवात सर्वाधिक भेसळयुक्त खवा बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे. उत्सवाच्या काळात पेढे, मिठाईला विशेष मागणी असते. गुजरातमधील भेसळयुक्त खव्याची विक्री पुणे, नागपूर, परराज्यातील हैदराबादसारख्या शहरात मोठय़ा प्रमाणावर केली जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.