पुणे आणि मुंबई द्रुतगती मार्गावर तीन व्यापाऱ्यांचा पाठलाग करून पोलिसांनी २ कोटी ९० लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. उर्से टोल नाक्यावर संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गौरव अग्रवाल, नवेंदू गोयल आणि दिलीप गुप्ता यांना या जुन्या नोटांप्रकरणी लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

गौरव अग्रवाल आणि दिलीप गुप्ता हे दोघे व्यवसायानं बिल्डर आहेत तर नवेंदू गोयल हा व्यापारी आहे. हे तिघेही २ कोटी ९० लाखांचं जुनं चलन बदलण्यासाठी मर्सिडिज बेंझ या गाडीतून मुंबईला आले होते. मात्र या तिघांना दिवसभर एकही दलाल भेटला नाही, त्यामुळे ते पुण्याला परतत होते.

याबाबतची टीप पुणे ग्रामिण पोलिसांना मिळाली, ज्यानंतर लोणावळा पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून उर्से टोलनाक्याजवळ कारवाई केली. देहू रोड पोलिसांनीही या तिघांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला होता. त्यामध्ये हे तिघे सहजच सापडले. आता या नोटा नेमक्या कुठून आणल्या त्या कोणाकडे घेऊन चालले होते? याची उत्तरं पोलीस शोधत आहेत. जप्त करण्यात आलेल्या बहुतांश नोटा ५०० रूपयांच्या आहेत असे समोर आले आहे.