कमी श्रमात पैसे मिळवण्यासाठी काही जण चोरी, घरफोडी असे गुन्हे करण्यास सुरुवात करतात. काही गुन्हे उघड होत नाहीत, त्यामुळे चोरटय़ांचे धारिष्टय़ वाढून चोरटे सराईत होत जातात. कमी श्रमात मिळणाऱ्या पैशातून ऐषाराम करायची सवय त्यांना जडते. कोंढवा, बिबवेवाडी भागांत घरफोडी करणारा रफीक शेख नावाचा चोरटा त्यापैकी एक. पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त शिथिल झाल्यानंतर रफीक बंद घरांची टेहळणी करून घरफोडी करायचा. रफीकने घरफोडीच्या गुन्हय़ात बिबवेवाडीतून दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्याने चोरलेली दुचाकी कोंढवा भागात लावली होती. ही दुचाकी घेण्यासाठी तो येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलिसांना रफीक शेखला पकडण्यासाठी तब्बल साडेअकरा तास पाळत ठेवावी लागली..

रफीक शेख (वय २१, रा. कोंढवा) याच्याविरुद्ध घरफोडीचे तीस गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी हडपसर भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंब चालवते. काही कामधंदे न करणाऱ्या रफीकला कमी श्रमात पैसे मिळवायचे होते. त्यासाठी त्याने घरफोडीचा मार्ग निवडला होता. बिबवेवाडी, कोंढवा भागातील बंद घरे, सदनिकांची टेहळणी तो करायचा. रात्री पोलिसांची गस्त असल्याने रफीक पहाटेच घरफोडी करण्यासाठी बाहेर पडायचा. पहाटे पोलिसांची गस्त शिथिल होते. तो घरफोडी करून पसार व्हायचा. काही महिन्यांपूर्वी बिबवेवाडी भागात एक घरफोडी झाली होती. तेथून एक दुचाकी, दूरचित्रवाणी संच आणि सोन्याचे कडे रफीकने चोरले होते. ही दुचाकी रफीक वापरत होता. त्या दुचाकीचा क्रमांक ‘२२९४’ असा होता. चोरलेली दुचाकी रफीक आणि त्याचा साथीदार शाहरूख खान वापरत असल्याची माहिती खबऱ्याकडून कोंढवा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या दुचाकीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दुचाकी सापडत नव्हती, असे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मििलद गायकवाड यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाग्योदयनगर परिसरात एक दुचाकी बेवारस अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दुचाकीच्या परिसरात पाळत ठेवली होती. दुचाकी घेण्यासाठी कोणीच आले नव्हते. त्यानंतर पुन्हा या दुचाकीच्या परिसरात पाळत ठेवण्यात आली होती. साध्या वेशातील पोलिसांना दुपारी तीनच्या सुमारास तेथे पाळत ठेवली. अखेर पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीच्या परिसरात एक जण घुटमळत असल्याचे साध्या वेशातील पोलिसांनी पाहिले. दुचाकी घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीत तो सराईत चोरटा रफीक शेख असल्याचे निष्पन्न झाले. शेखला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याने साथीदार शाहरूख खान याच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. शाहरूख अरण्येश्वर भागात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले. सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी तो घरी नसल्याची बतावणी केली होती. पोलिसांनी घराची पाहणी केली असता तो घरात लपून बसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत रफीक आणि त्याचा साथीदार शाहरूख यांनी कोंढवा आणि बिबवेवाडी भागाच चार घरफोडय़ा केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरटय़ांकडून चौदा तोळे सोन्याचे दागिने, एक दुचाकी, एक दूरचित्रवाणी संच असा माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, जगदीश पाटील, विलास पालांडे, संजय कदम आदींनी चोरटय़ांना पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, रफीक शेखला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्यात असलेल्या तपास पथकातील खोलीत काचेच्या खिडकीवर डोके आपटून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो जखमी झाला असून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rahul.khaladkar@expressindia.com