करोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छतेची प्रशासनाकडून काळजी घेतली जात असताना पिंपरी-चिंचवडमध्ये थुंकण्यावरून भाजपाच्या एका नगरसेवकाला पोलिसांनी चोप दिला आहे. त्याचबरोबर नोटीस बजावत नंतर त्याला सोडूनही देण्यात आलं. दरम्यान, संबंधित नगरसेवकाला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची माफी देखील मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे सर्वसामान्यांना अनेकदा रस्त्यावर न येण्याचं आवाहन करूनही ते वारंवार रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला समोरं जावं लागत आहे. यामुळे एक चांगली बाब समोर आली आहे ती म्हणजे कायद्याचे तंतोतंत पालन करताना पोलिसांच्या तावडीतून आता कुठलाच प्रभावशाली आणि राजकीय व्यक्ती देखील सुटताना दिसत नाहीत. कायदा मोडणाऱ्या या प्रत्येकावर कारवाई केली जात आहे.

आणखी वाचा- खाकी वर्दीतली माणुसकी : उपासमारीची वेळ आलेल्या दाम्पत्यासाठी पोलीस ठरले देवदूत

‘हम यहा के रॉबेन हुड पांडे है’ हा हिंदी चित्रपटातील संवाद सध्या राज्यातील पोलिसांबाबत खरा ठरत आहे. अनेकदा पोलिसांकडून कारवाई करताना राजकीय व्यक्तींना सूट दिली जाते असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, तो आता पोलिसांनी चुकीचा ठरवला आहे. संबंधित भाजपाचा नगरसेवक आपल्या मोटारीतून तीन ते चार व्यक्तींना घेऊन चालला होता. तेव्हा, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी आपण नगरसेवक असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. इतकेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेचं कारण देत आईची तब्बेत बरी नसल्याचं कारणही त्यानं सांगितलं. पोलिसांनी त्याच्याकडं वैद्यकीय कागदपत्रांची विचारणा केल्यानंतर त्यानं काही मिनिटं फोन करून कागदपत्र मागवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी हा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्यांच्यासमोर गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकला.

आणखी वाचा- Lockdown : ‘बाबांनो आता तरी घरी बसा’; एका पुणेकराचे इतर पुणेकरांना आवाहन

नगरसेवकाच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी तीन ते चार काठ्या मारत नगरसेवकाला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात पाठवले. आपली चूक झाल्याचे लक्षात येताच आणि हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून संबंधित नगरसेवकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची माफी मागितली. दरम्यान, १४९ कलमानुसार या नगरसेवकाला नोटीस बजावण्यात आली असून यातून कायद्यापुढे सर्वसारखे आहेत असा संदेश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police took action on bjp corporator who spit gutkha on road aau 85 kjp
First published on: 07-04-2020 at 16:58 IST