शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो बेवारस वाहने अक्षरश: धूळखात पडली आहेत. या वाहनांचे मालक सापडत नसल्याने पोलिसांच्या दृष्टीने बेवारस वाहने ही मोठीच डोकेदुखी ठरली आहे. या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया किचकट असल्याने वर्षांनुवर्षे पडीक असलेली ही वाहने जपून ठेवण्याचीही वेळ पोलिसांवर आली आहे.
नेहरू रस्त्यावरील अप्सरा चित्रपटगृहानजीक असलेल्या मुठा उजव्या कालव्यालगत वाहतूक पोलिसांची चौकी आहे. सोमवारी (१ फेब्रुवारी) दुपारी चौकीशेजारी लावलेल्या पडीक वाहनांना अचानक आग लागली आणि आगीत बारा दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तेथे ठेवण्यात आलेली पोलिसांची जुनी कागदपत्रेही या आगीत जळाली. आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात बेवारस अवस्थेत पडलेल्या वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बऱ्याचदा चोरलेल्या वाहनांचे हवे असलेले काही भाग काढून घेऊन अशी वाहने रस्त्याच्या कडेला लावून चोरटे पसार होतात. काही घटनांमध्ये चोरटे अशा वाहनांचा वापर गुन्हा करण्यासाठी करतात. बेवारस किंवा अपघातग्रस्त वाहने पोलीस नजीकच्या पोलीस ठाण्याच्या आवारात लावून ठेवतात. ज्यांची वाहने चोरीला जातात अशांपैकी अनेक वाहनचालक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. वाहनांचा मूळ मालक सापडत नसल्यास पोलीस अशा वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करतात. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहने निकाली काढण्याची कारवाई बारा वर्षांपूर्वी केली होती. ही दुचाकी वाहने अप्सरा चित्रपटगृहानजीक असलेल्या वाहतूक शाखेच्या चौकीच्या परिसरात लावण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून ही वाहने तेथेच पडून आहेत. वाहनांचे मूळ मालक दंड भरून वाहने ताब्यात घेतात. मात्र, अनेक वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहनचालक आलेले नाहीत. त्यामुळे वाहने तेथेच पडून होती, अशी माहिती स्वारगेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एस. ए. शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार कालबाह्य़ वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागातर्फे  कारवाई केली जाते. पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केल्यानंतर ती पोलीस ठाण्यांच्या आवारात लावली जातात. प्रादेशिक परिवहन विभागाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे ही वाहने पोलीस ठाणे किंवा चौकीच्या परिसरात लावली जातात. वाहनचालक त्यांची वाहने घेण्यास येत नसल्याने ती वर्षांनुवर्षे पोलिस चौकीच्या आवारात पडून राहतात, असेही शिंदे यांनी सांगितले.

बेवारस वाहनांची विल्हेवाट परस्पर लावण्याचे अधिकार पोलिसांकडे नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो. त्यातून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा केली जाते. रस्त्यांवर बेवारस वाहने आढळतात. अशी वाहने पोलीस ताब्यात घेतात. या वाहनांचे मूळ मालक पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. काही वेळा तर वाहने अनेक दिवस रस्त्यावर धूळखात पडलेली असतात. पोलीस तेथे कारवाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर वाहनांचे मालक पोलिसांशी संपर्क साधतात, असाही अनुभव आहे.
सारंग आवाड, उपायुक्त, वाहतूक शाखा