भाजपविरोधात एकजूट; लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मुद्देच पालिका आखाडय़ातही

पिंपरी : लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतरचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांना पालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याने स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणे बदलली आहेत. दोन वर्षांनंतर जरी पालिका निवडणुका होणार असल्या तरी त्या आखाडय़ात तेच प्रश्न आणि मुद्दे ऐरणीवर राहतील, अशी चिन्हे आहेत. कारण, त्यादृष्टीने आतापासूनच भाजपविरोधकांची व्यूहरचना दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या काळात असणारी राजकीय गणिते विधानसभा निवडणुकांवेळी बदललेली होती. विधानसभा निकालानंतरची राजकीय उलथापालथ पाहता, दोन वर्षांनंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीवेळी आणखी समीकरणे बदलू शकतात. भाजप विरोधात इतर पक्ष एकवटले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकांवेळी वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजमितीला भाजपला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे राजकारण सुरू आहे. शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे त्याच प्रश्नांवर, मुद्दय़ांवर पालिका निवडणुका लढवल्या जातील, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

शहरातील विस्कळीत आणि अपुऱ्या प्रमाणात होत असलेला पाणीपुरवठा हा शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेला आहे. सत्तारूढ भाजप वगळता जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी पाण्याच्या विषयावरून आंदोलने केली आहेत. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होताना दिसून येते. कचऱ्याच्या निविदांमागचे अर्थकारण, त्यातून मिळणाऱ्या मलिद्यासाठी झुंजणारे नेते, नगरसेवक आणि अधिकारी हे समस्येमागचे मूळ कारण आहे. आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या वाढत्या व्याप्तीबरोबरच वाढत चाललेली गुन्हेगारीही शहरवासीयांच्या दृष्टीने डोकेदुखी आहे.

शास्तिकर, स्वच्छता, कायदा सुव्यवस्था अशा प्रश्नांतही त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे पितळं उघड पाडण्याचे कामच पालिका निवडणुकांपर्यंत काँग्रेसकडून केले जाईल. इतर पक्षांप्रमाणे आमची भाजपविरोधाची धार कमी होणार नाही. भाजपला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही राहील.

– सचिन साठे, पिंपरी शहराध्यक्ष (काँग्रेस)