राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचे भांडवल करत पिंपरी पालिकेची सत्ता हस्तागत केलेल्या भारतीय जनता पक्षाने स्वच्छ, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त काम करण्याचा दावा केला आहे. मात्र, त्या दृष्टीने आवश्यक कृती करताना त्यांनी हात आखडता घेतला आहे. पिंपरीत तुकाराम मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी आयुक्तपदी आणा, अशी मागणी भाजपच्याच सरचिटणिसाने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यास पाठबळ देण्याऐवजी सर्वानीच सोयीस्कर मौन धारण केले. मुंढे शहरात आल्यास कोणाचेच ‘दुकान’ चालणार नसल्याने ‘मुंढे, नको रे बाबा’ असाच सावध पवित्रा सत्ताधारी नेत्यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराने कळस गाठला म्हणूनच पिंपरी पालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपकडे कारभाराची सूत्रे आली. ‘नवे गडी, नवे राज्य’ सुरू झाल्यानंतर आम्ही भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार करू, असा दावा भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सारे काही जैसे थे असून खाणारी तोंडे बदलली आहेत, असा जाणकारांचा सूर आहे. संघ परिवारातून आलेले भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी, पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच पारदर्शी कारभारासाठी तुकाराम मुंढे यांनाच आयुक्तपदी नियुक्त करावे, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावरून पक्षातच नाराजी पसरली. थोरातांच्या मागणीविषयी कोणीही काहीही भाष्य करण्यास तयार नाही. मुंढे शहरात आल्यास मनासारखे काहीच करता येणार नाही,

अशीच भीती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे ‘तुकाराम मुंढे नको रे बाबा’ यावर भाजपसह सर्वाचे अघोषित एकमत असल्याचे दिसते.

पिंपरीत आतापर्यंत अजित पवार कारभारी होते. त्यांच्या मर्जीतील अधिकारीच आयुक्त म्हणून शहरात आले. दिलीप बंड पिंपरीत चार वर्षे आयुक्त होते. आशिष शर्मा यांनाही चार वर्षे मिळाली. डॉ. श्रीकर परदेशी यांची १८ महिन्यांत बदली झाली. राजीव जाधव यांचीही २४ महिन्यांच्या कारकीर्दीनंतर बदली झाली. निवडणुकीच्या तोंडावर ‘पवारप्रेमी’ आयुक्त नको, अशी मागणी भाजप नेत्यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांनी जाधवांची बदली केली. तेव्हाच, तुकाराम मुंढे पिंपरीत येणार, अशी चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात, तसे झाले नाही. मुंढे नवी मुंबईला गेले आणि तेथील आयुक्त दिनेश वाघमारे पिंपरी-चिंचवडला आले. वाघमारे यांच्या कार्यपद्धतीवरून सर्वपक्षीय नाराजी आहे. वाघमारे यांना बदलीचे वेध लागले असून त्यासाठी त्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू आहेत. त्यांची आज ना उद्या बदली होणारच आहे. त्यानंतर, चांगला व खमक्या आयुक्त शहराला मिळावा, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. मुंढे यांच्याकडे ते सर्व गुण आहेत. मात्र, पारदर्शकतेची भाषा करणाऱ्या भाजपला मुंढे यांची प्रामाणिक कार्यपद्धती परवडणारी नसल्याने ‘मुंढे नको,’ यावर ते ठाम आहेत.

मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंपरीत भाजपची एकहाती सत्ता आहे. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार करण्याचा भाजपचा आग्रह आहे. त्यानुसार, तुकाराम मुंढे यांच्यासारखा धाडसी व सक्षम अधिकारी हवा आहे. सध्या पालिका प्रशासन सुस्तावलेले असून पारदर्शी कारभाराचा अभाव आहे. आयुक्त दिनेश वाघमारे उदासीन असून ‘आला दिवस ढकलण्याचे’ काम करत आहेत. विकासाची गती खूपच मंदावली आहे. अशा परिस्थितीत, तुकाराम मुंढे यांच्यासारखाच आयुक्त पिंपरीत आल्यास खऱ्या अर्थाने पारदर्शी कारभार होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.

– अमोल थोरात, सरचिटणीस, पिंपरी भाजप