सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी काहीजण सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा याला विरोध आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. “सोशल मीडियावरुन याप्रकरणी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच यात अनेक मोठे लोकही बोलायला लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता राजकारण सुरु असल्यासारखं वाटतं.” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, “सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि सिनेसृष्टीत नाव कमावलेले सुशांतसिंह ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर अनेकांचं ते प्रतिनिधीत्व करीत होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. मात्र, हे करीत असताना त्यामध्ये राजकारण यायला नको. सध्या याबाबत सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या जात आहेत. मोठं मोठी लोकंही आता यात बोलायला लागली आहेत. या घटनेत अन्याय झाला असं म्हटलं जातंय. त्यावरुन बिहार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही यावर चर्चा सुरु आहेत. त्यामुळे मला व्यक्तिगतरित्या यामध्ये कुठेतरी राजकारण सुरु असल्याचं वाटतंय. त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.”

दरम्यान, एकीकडे राज्य शासन या प्रकरणाचा तसाप सीबीआयकडे द्यायला तयार नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “या प्रकरणी पार्थ पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं ते काळजीतून केलं होतं. ती काळजी महत्वाची होती म्हणून त्यांनी गृहमंत्र्यांकडे याबाबतची मागणी लिखित स्वरुपात पोहोचवली होती. पार्थ पवारांच्याच मताचा मी देखील आहे. मात्र, आपल्याच पोलिसांच्या मदतीने देखील या गोष्टी करता येतील.”

“सुशांतसिंह यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर याबाबतचं प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागावं, अशी सर्वांचीच मागणी आहे. पण हे होत असताना ज्या सिनेसृष्टीत सुशांतसिंह काम करीत होते. त्याच क्षेत्रातही अनेक लहान मोठे कलाकार तंत्रज्ञ मंडळी यांनी आत्महत्या केल्या असतील. छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी किंवा इतर क्षेत्रातले लोकांनीही आत्महत्या केल्या असतील, त्याबद्दल कोणीच का काही बोलत नाही?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.