एलबीटीला विरोध करावा की त्याचे समर्थन, याविषयी शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये व नगरसेवकांमध्ये मतभिन्नता व गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांच्याकडे असल्याने राष्ट्रवादीची ‘अडचण’ झाली आहे. व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्यास सर्वसामान्यांची नाराजी ओढावून घेऊ, अशी भीती असल्याने तूर्त बहुतांश नेतेमंडळींनी चार हात लांब राहणे पसंत केले आहे.
राज्यशासनाने एलबीटी लागू केल्यापासून व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सुरुवातीपासून बाबरांकडेच नेतृत्वाची धुरा असून विरोधी पक्षातील मोजकेच नेते त्यांच्यासोबत आंदोलनात आहेत. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे यांनी सर्वप्रथम व्यापाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली. बाबर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या व्यापाऱ्यांच्या मोर्चात विलास लांडे सहभागी झाले. हळूहळू राष्ट्रवादीचे नगरसेवकही संधी मिळेल तिथे एलबीटीच्या विरोधात बोलू लागले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले व त्याचे पडसाद उमटू लागले तसे व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलणे टाळले जाऊ लागले. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात बाबर पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी पालिकेलाच टार्गेट केले आहे. त्यामुळे आंदोलक व महापालिका असाच संघर्ष दिसू लागला आहे.
व्यापारी सर्वच राजकीय पक्षांशी संबध ठेवून आहेत. मात्र, बाबरांनी हे आंदोलन एकप्रकारे ‘हायजॅक’ केल्याने राष्ट्रवादीचे नेते त्यापासून चार हात लांब आहेत. आझम पानसरे यांनी एकेकाळी शहरातील व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले आहे. त्यांनीही व्यापाऱ्यांची थेट बाजू घेतली नाही. आडमुठेपणा करू नका, आंदोलन मागे घेऊन पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू करा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यशासनाने लवकर तोडगा काढावा, अशी मागणी महापौर मोहिनी लांडे यांनी केली आहे. तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे. दुकाने उघडून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे व शासनाने दोन पावले मागे यावे, अशी भूमिका आमदार लांडे यांनी घेतली आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी दुपापर्यंत दुकाने उघडण्याचा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे. एकूणात, राष्ट्रवादी ठोस भूमिका घेत नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे.