बक्षीस समारंभ न झाल्याने राष्ट्रवादीचे पालिका मुख्यालयात ‘ढोल बजाओ’ आंदोलन

पिंपरी पालिकेच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ न झाल्याच्या मुद्दय़ावरून टीकेचे लक्ष्य झालेल्या सत्तारूढ भाजपला सोमवारी पालिका मुख्यालयात ‘ढोल बजाओ आंदोलन’ करत राष्ट्रवादी काँग्रेसनेही खिंडीत गाठले.

पालिकेने सजावट स्पर्धा घेतल्या, मात्र त्याचा बक्षीस समारंभ घेतला नाही, यावरून मंडळांमध्ये नाराजी आहे. सांगवीत दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यक्रमात काही मंडळांनी ही नाराजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोरच व्यक्त केली होती. तेव्हा महापौर राहुल जाधव यांनी लवकरच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होईल, असे तेव्हा जाहीर केले होते. प्रत्यक्षात त्यानुसार पालिकेने कार्यवाही न केल्याने या मुद्दय़ावरून राजकारण सुरू झाले आहे. त्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.

बक्षीस समारंभ न घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिल्यानंतर भाजपने घाईघाईने शुक्रवारी (२१ सप्टेंबर) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात बक्षीस समारंभाचे आयोजन केल्याचे जाहीर केले. मात्र, तरीही शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र्नवादीने सोमवारी मुख्यालयात निर्धारित ढोल बजाओ आंदोलन केले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी या संदर्भात सांगितले, की न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार पालिकेला सण, उत्सवांसाठी खर्च करता येत नाही. त्यामुळे बक्षीस समारंभ घेण्यास अडचण आहे, मात्र त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. महापौर व आपण हा खर्च करणार आहोत. त्यानुसार शुक्रवारी भाजप नेते व पालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होणार आहे.