एका आमदाराने आपल्याला जिवे मारण्याची योजना आखली असून त्यात राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मंडळींचा समावेश आहे, असा आरोप पिंपरीतील एका नागरिकाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी कॅम्पातील एका बँकेचे सुडाचे राजकारण यामागे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
मुख्य न्यायाधीश, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात एका आमदारासह, एक माजी उपमहापौर, एक माजी नगरसेवक, एका शहराध्यक्षाचा भागीदार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नावे त्यात आहेत. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.                                         अर्जात नमूद तक्रारीनुसार, पिंपरी बाजारपेठेत माझे दुकाने असून ते तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दुकान वाचवायचे असल्यास १० लाख रूपयांची मागणी होत आहे. पैसे न दिल्यामुळे खोटय़ा तक्रारी केल्या जात आहेत. या सर्वानी एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयात बसून फायरिंग घडवून आणायचे व त्यात आपले व बंधूचे नाव गोवायचे, असा डाव रचला आहे. माझा खून कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पोलीस व कोर्ट कचेरी पाहून घेऊ, अशी सुपारी एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला देणार असल्याची माहिती खात्रीशीर व्यक्तींकडून मला समजली आहे. एखादी तरूणी बघ, पाच-दहा लाख रूपये देऊ  व बलात्काराची खोटी तक्रार दाखल करू, खर्च आम्ही करू, अशी त्यांची तयारी आहे.                                                                     दोन महिन्यापूर्वी हिंजवडी परिसरात या मंडळींनी एक खून केला आहे. ही मंडळी खतरनाक असून त्यात राजकीय मंडळी आहेत. माझ्या व भावाच्या जिवास धोका असून वेडेवाकडे काही झाल्यास हे पाच लोक जबाबदार राहतील, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे. पिंपरीतील एका बँकेची निवडणूक आपण लढवणार आहे, त्यापूर्वीच आपल्याला अडकवण्याचा डाव असल्याचा संशय त्यात आहे.