सध्या चोवीस तास चालणाऱ्या मालिकांमधून दाखविले जाते तसे राजकारण चटपटीत व बटबटीत नाही, राजकारणाचे पैलू गहरे व त्यांची अंग अनेक आहेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
‘साहित्य चपराक’च्या दिवाळी विशेषांकाबरोबरच पत्रकार संजय ऐलवाड यांच्या ‘अंतरीच्या कविता’ या संग्रहाचे व सागर कळसाईत यांच्या ‘कॉलेज गेट’ या कादंबरीच्या दुसऱ्या अवृत्तीचे प्रकाशन भंडारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कवयित्री अंजली कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनावणे, ‘साहित्य चपराक’चे संपादक घन:शाम पाटील, चंद्रलेखा बेलसरे आदी त्या वेळी उपस्थित होते.
लिहिण्यासाठी राजकारणामध्ये अनेक अव्हानात्मक विषय आहेत. पडद्यावर दाखविले जाते तसे राजकारण नसते, असे सांगून भंडारी म्हणाले, की राजकारणात सगळे खरे लिहिता येत नाही. त्यामुळे मी निवृत्त झाल्यावर त्यावर लिहीन. पत्रकारितेबाबत ते म्हणाले, की लहान वृत्तपत्र किंवा साप्ताहिक चालविणाऱ्यांकडे समाजाचा पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्याकडे फारसे सन्मानाने पाहिले जात नाही. सर्वच जण खंडणीबहाद्दर नसता काही जण निष्ठेने व प्रामाणिकपणे पत्रकारिता करतात. त्यांचा योग्य सन्मान होणे गरजेचे आहे.
कुलकर्णी म्हणाले, की ग्रामीण भागामध्ये शुद्ध हवा असते व तेथील माणसेही लढणारी असतात. ती शुद्ध हवा व लढावूपणा घेऊन ग्रामीण भागातील साहित्य सध्या मोठय़ा प्रमाणावर येत आहे. वाचकही ग्रामीण साहित्याकडे वळतो आहे.